कुरणेवाडीत अवैध वाळू उपशावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:24 AM2021-07-22T04:24:10+5:302021-07-22T04:24:10+5:30
वरकुटे मलवडी : माण तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या कुरणेवाडी येथील ओढ्यातून अवैधपणे वाळू उपसा करून ओढ्याचे विद्रुपीकरण करणाऱ्या वाळू ...
वरकुटे मलवडी : माण तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या कुरणेवाडी येथील ओढ्यातून अवैधपणे वाळू उपसा करून ओढ्याचे विद्रुपीकरण करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करून माण तालुक्याच्या तहसीलदार बाई माने यांनी चांगलाच दणका दिला आहे.
तहसीलदार माने यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकाऱ्यांच्या पथकाने कुरणेवाडी येथे बेकायदेशीर वाळू उपसा व गौण खनिज उत्खननाच्या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला असून, दोन टेम्पोसह वाळू चोरांनी पलायन केले. अचानक झालेल्या या कारवाईने वाळूची चोरटी वाहतूक करणारे चांगलेच धास्तावले आहेत.
याबाबत माहिती अशी की, कुरणेवाडी येथे अवैधरित्या बेसुमार वाळू उपसा व अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांना मिळाली. त्यानुसार शनिवार, दि. १७ रोजी रात्री त्याठिकाणी जाऊन ही कारवाई केली आहे. कुरणेवाडी येथील ओढ्यात ट्रॅक्टर व टेम्पोच्या साह्याने वाळूची बेकायदेशीर वाळूची वाहतूक सुरु होती. त्याठिकाणी चांगदेव बापू आटपाडकर यांच्या मालकीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. तर कारवाईच्या भीतीने उत्तम बापू आटपाडकर व पोपट बापू आटपाडकर यांच्या मालकीचे दोन टेम्पो घेऊन वाळू चोरांनी धूम ठोकल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ओढ्यात अन्य शेतकऱ्यांच्याही मालकी हद्दीत अनेक ठिकाणी मातीचा थर उत्खनन करून त्याखालील ६० ते ७० ब्रास वाळूचा उपसा करण्यात आल्याचे आढळले आहे.
(कोट)
माण तालुक्यातील कुरणेवाडी येथे वाळू उपसा होत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर मंडल अधिकाऱ्यांची पथके नेमून वाळू ओढणाऱ्या ट्रॅक्टर व टेम्पोवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही कारवाई सुरूच ठेवण्यात येईल.
- बी. एस. माने, तहसीलदार, ता. माण