कलेढोण येथे अवैध वाळूवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:41 AM2021-04-28T04:41:58+5:302021-04-28T04:41:58+5:30
मायणी : ‘खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परवर मायणी पोलिसांनी कारवाई करून ७ लाख ...
मायणी : ‘खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डम्परवर मायणी पोलिसांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक केली,’ अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली.
याबाबत माहिती अशी की, विटा-कलेढोण मार्गावर कलेढोण हद्दीतून डम्परमधून अवैध वाळू वाहतूक रात्रीच्या वेळी सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल बाबूराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, प्रकाश कोळी, होमगार्ड रोहित घाडगे यांनी कलेढोण गावातील श्री खंडोबा मंदिराच्या येथे सापळा लावला.
त्या वेळी विटा-कलेढोण मार्गावरून माहिती मिळालेले वाहन (एमएच १२ सीटी ९७९४) येताना दिसले. संबंधित वाहन थांबविल्यानंतर वाहनाबाबत चौकशी केली असता यामध्ये विनापरवाना वाळू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डम्पर चालक सचिन मधुकर माने (वय २३, रा. घाणंद, ता. आटपाडी, जि. सांगली) व अमोल रामचंद्र जुगदर (वय ३२, रा. जांभुळणी, ता. आटपाडी) या दोघांना अटक केली.
त्यांच्याकडून डम्पर किंमत ७ लाख व डम्परमधील अवैध वाळू ३ ब्रास २१ हजार रुपये असा एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेची नोंद मायणी पोलीस दूरक्षेत्रात झाली असून, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करीत आहेत.
फोटो संदीप कुंभार यांनी मेल केला आहे.
कलेढोण हद्दीत विनापरवाना वाळू वाहतूक करणारा डम्पर मायणी पोलिसांनी हस्तगत केला. (छाया : संदीप कुंभार)