‘त्या’ फडाचा झाला पंचनामा; तपास सुरू ; गर्भलिंग निदान प्रकरणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 09:50 AM2023-12-13T09:50:09+5:302023-12-13T09:51:27+5:30
फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील एका उसाच्या शेतात गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या एका घराजवळ जाऊन आरोग्य विभागाने मंगळवारी पंचनामा केला.
सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील एका उसाच्या शेतात गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या एका घराजवळ जाऊन आरोग्य विभागाने मंगळवारी पंचनामा केला. तेथील काही लोकांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी फलटणच्या वैद्यकीय अधीक्षकांना केल्या.
फलटण येथे उसाच्या फडातच गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन ‘लोकमत’ने सोमवारी केले. याचे सविस्तर वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. करपे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. फलटणमधील वैद्यकीय अधीक्षकांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर स्वत: डाॅ. करपे आणि फलटणच्या वैद्यकीय अधीक्षकांचे पथक जिथे गर्भलिंग निदान केले जाते होते, त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांनी तेथील लोकांची चाैकशी करून जबाब नोंदवले.
गैरप्रकार केले कथन
गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार तेथे सुरू असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे.
‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर बऱ्याच नागरिकांनी अनुभव कथन केले.
वाई तालुक्यातील एका महिलेने आपला अनुभव सांगितला. ती तिसऱ्या वेळी गर्भवती राहिली. अगोदर तिला दोन मुली. आता तिसरा वंशाचा दिवा व्हावा,अशी तिची आणि पतीची इच्छा होती. कोठून तरी त्यांना पिंप्रदच्या डाॅक्टरांची माहिती मिळाली.
एकच चर्चा ‘तो’ डाॅक्टर कोण?
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गर्भलिंग निदान करणारे ‘ते’ डाॅक्टर कोण, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे.