कुचराई करणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई
By admin | Published: July 10, 2014 12:23 AM2014-07-10T00:23:40+5:302014-07-10T00:28:22+5:30
कृषी विभाग : सिमेंट बंधाऱ्यांबाबत मुंबईतील बैठकीत शशिकांत शिंदे यांचे संकेत
पुसेगाव : कोरेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी चार कोटींचे सिमेंट बंधारे मंजूर आहेत. या कामांची तातडीने निविदा काढून बंधाऱ्याची कामे मार्गी लावावीत. कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. या कामांमध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कोरेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी उपलब्ध असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांच्या कामाबाबात जलसंपदा (कृष्णा खोरे) तथा पालकमंत्री शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे कृषी अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी आ. प्रभाकर घार्गे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप विधाते, कृषी संचालक सुरेश अनलंगेकर, डॉ. राजेंद्र देशमुख, जलसंधारण अप्पर सचिव कऱ्हाडकर, सातारा जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंंह कदम, कोरेगाव तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे उपस्थित होते. कोरेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतील सिमेंट बंधाऱ्यासाठी चार कोटींचा निधी मंजूर आहे. मात्र याची कामे ‘बी वन’ निविदाप्रकिया करूनच करावीत, असा आदेश शासनाने कृषी विभागाला दिला होता.
या आदेशामुळेच कोरेगाव तालुक्यातील सिमेंट बंधाऱ्यांची कामे रखडली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक प्रतापसिंह कदम यांनी बैठकीत पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर आगामी काळातील पाणीटंचाईचे गांभीर्य ओळखून कृषी विभागाने ‘बी वन’ची निविदा काढून बंधाऱ्यांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश मंत्री शिंदे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पाणलोट व सिमेंट बंधाऱ्यांची कामे चांगल्या दर्जाची होण्याकरिता अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष केंद्रित करावे तसेच कामांमध्ये हालगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांची गय केली जाणार नाही, असा इशारा आ. घार्गे यांनी दिला. (वार्ताहर)