अवैध माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई, माती सम्राटांचे धाबे दणाणले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 06:53 PM2022-01-31T18:53:08+5:302022-01-31T18:53:56+5:30
रामापूर : कोयना नदी काठावरून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका प्रांताधिकारी सुनील गाढे ...
रामापूर : कोयना नदी काठावरून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी लावला आहे. तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनाही अवैध माती उत्खननावर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे माती सम्राटांचे धाबे दणाणले आहे. कारवाई अखंडित सुरू ठेवण्याची मागणीही जनतेतून केली जात आहे.
माती उत्खनन केलेल्या ठिकाणचे महसूल विभागाकडून तातडीने पंचनामे करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोयना नदीकाठावरील नेरळे ते नावडीपर्यंत ठिकठिकाणी मातीचे उत्खनन सुरू आहे. हे उत्खनन करत असताना महसूल प्रशासनाची परवानगी घेतली असली तरी प्रत्यक्षपणे उत्खनन मात्र मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. जमिनीच्या खाली १५ ते २० फूट उत्खनन राजरोज सुरू होत आहे. टीचभराचा परवाना आणि हातभर उत्खनन करण्यात येत असल्याने कोयनाकाठ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
दररोज शेकडोंच्यावर नियमबाह्य मातीने भरलेली चारचाकी वाहने ये-जा करत असतात. माती उत्खनन केल्याने पावसाळ्यात नदीकाठावरील अनेक गावांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. याचा अनुभव गेल्या दोन वर्षांत नदीकाठी असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना आला आहे.
दि. २९ रोजी अचानक प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी नियमबाह्य माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा धडाका सुरू करून दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. तालुक्यात अशा पद्धतीने अवैध माती उत्खनन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचनाही प्रांताधिकारी गाढे यांनी तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांना दिल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील माती सम्राटांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत सातत्य ठेवून नदीकाठीच्या शेतीचे आणि पर्यावरणाचे रक्षण व्हावे, अशी मागणीही जनतेतून केली जात आहे.