दुचाकींवरून शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर कारवाई, कऱ्हाडातील प्रकार 

By दीपक शिंदे | Published: July 31, 2024 12:14 PM2024-07-31T12:14:14+5:302024-07-31T12:14:28+5:30

कऱ्हाड : विद्यानगर-कऱ्हाड येथे महाविद्यालयाच्या गजबजलेल्या रस्त्यातून दुचाकींची शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच संबंधित ...

Action was taken against as many as 51 youths who were racing on two-wheelers | दुचाकींवरून शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर कारवाई, कऱ्हाडातील प्रकार 

दुचाकींवरून शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर कारवाई, कऱ्हाडातील प्रकार 

कऱ्हाड : विद्यानगर-कऱ्हाड येथे महाविद्यालयाच्या गजबजलेल्या रस्त्यातून दुचाकींची शर्यत लावणाऱ्या तब्बल ५१ युवकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. तसेच संबंधित युवकांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली. महाविद्यालय परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर वाहतूक शाखेने लक्ष केंद्रित केले असून, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी दिला आहे.

विद्यानगर येथे विविध शाखांचे शिक्षण देणारी अनेक महाविद्यालये आहेत. तसेच माध्यमिक विद्यालयांची संख्याही या परिसरात जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांसह युवक-युवतींचा कऱ्हाड-मसूर रस्त्यावर मोठा राबता असतो. त्यातच वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणावर असल्याने रस्त्यात गर्दी असते. अशात काही युवक बनवडी फाट्यापासून ओगलेवाडीपर्यंत दुचाकींची शर्यत लावत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांना मिळाली. त्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करून संबंधित रस्त्यावर गस्त सुरू केली.

बनवडीफाटा ते ओगलेवाडी मार्गावर शर्यत लावणारे तब्बल ५१ युवक पोलिसांना आढळून आले. हे युवक भर पावसात भरधाव वेगात दुचाकी चालवित होते. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या तसेच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनधारक व पादचाऱ्यांच्या जिवाला धोका होता. ही बाब लक्षात आल्यानंतर सहायक निरीक्षक सूर्यवंशी यांनी संबंधित युवकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच काही युवकांच्या पालकांनाही वाहतूक शाखेत बोलावून घेण्यात आले. युवकांनी केलेल्या कृत्याबाबत पालकांना माहिती देऊन त्यांना समज देण्यात आली.

महाविद्यालय परिसरात रहदारी जास्त असते. तसेच अनेक युवक दुचाकी घेऊन महाविद्यालयात येतात. त्यामुळे या परिसरावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून दुचाकी अथवा इतर कोणतेही वाहन चालविताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. - संदीप सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, कऱ्हाड

Web Title: Action was taken against as many as 51 youths who were racing on two-wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.