नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:40 AM2021-02-24T04:40:14+5:302021-02-24T04:40:14+5:30
गत दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने आठवडा बाजार, धार्मिकस्थळे व पाचवीच्या पुढील शाळा, कॉलेज सुरू करण्यास परवानगी ...
गत दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने आठवडा बाजार, धार्मिकस्थळे व पाचवीच्या पुढील शाळा, कॉलेज सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, ग्रामस्थ नियमांचे पालन न करता सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. याला कुठेतरी आळा बसावा. ग्रामस्थांना सुरक्षिततेची जाणीव व्हावी. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, यासाठी पुन्हा एकदा नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी विभागात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
चाफळ ते पाडळोशी रस्त्यावर पोलिसांना शनिवारी दुपारी चार वाजता सहा जण विनामास्क फिरताना आढळून आले. त्यांच्यावर योग्य ती खबरदारी न घेता मानवी जीवन व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून संसर्ग पसरविण्याची घातक कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गत काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग तसेच पोलीस अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. ग्रामस्थांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे. मात्र, काहीजण विनाकारण दुचाकीवरून फिरत आहेत. याला आळा बसावा, यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पोलीस नाईक अमृत आळंदे, सुशांत शिंदे व होमगार्ड संभाजी हिमणे यांच्याकडून ही कारवाई केली जात आहे.
फोटो : २३केआरडी०३
कॅप्शन : चाफळ ते पाडळोशी रस्त्यावर मोहीम राबवून पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली.