अनधिकृत नौकांवर होणार कारवाई

By admin | Published: July 22, 2015 09:50 PM2015-07-22T21:50:58+5:302015-07-22T23:56:05+5:30

मत्स्य विभागाची तपासणी मोहीम : कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्यांचा डिझेल कोटा १ आॅगस्टपासून बंद

Action will be taken against unauthorized ships | अनधिकृत नौकांवर होणार कारवाई

अनधिकृत नौकांवर होणार कारवाई

Next

सिद्धेश आचरेकर -मालवण -सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील पर्ससीन हायस्पीड बोटींच्या अतिक्रमणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच जिल्ह्यातही अनधिकृत पर्ससीन व मिनी पर्ससीनसह अन्य प्रकारच्या अवैध मासेमारीसाठी विनापरवाना नौकांचा वावर वाढला आहे. मत्स्य व्यवसाय विभागातर्फे नौकांची तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरु झाली असून या मोहिमेत ज्या नौका अनधिकृत आढळून येतील त्यांच्यावर व्हीआरसी (नोंदणी कागदपत्र) रद्दची कारवाई केली जाणार आहे.
तसेच जे नौकाधारक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणार नाहीत, त्यांचा डिझेल कोटाही १ आॅगस्टपासून बंद होणार आहे. यामुळे विनापरवाना नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीला चाप बसणार आहे, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सुगंधा चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्याच्या सागरी हद्दीत विनापरवाना नौकांवरून पर्ससिन, मिनी पर्ससिननेटधारक व पारंपरिक मच्छीमार यांच्यातही अवैधरीत्या होणाऱ्या मासेमारीमुळे सातत्याने संघर्ष घडत आहे. यावर पारंपरिक मच्छिमारांनी आंदोलने छेडत मत्स्य व्यवसाय विभागाकडे कारवाईची मागणी केली होती. मत्स्य व्यवसाय खात्याने सहाय्यक मत्स्य व्यवसाय संचालक कार्यालयास जिल्ह्याच्या तिन्ही तालुक्यांमधील मच्छिमारांच्या नौकांची तपासणी करून अहवाल तयार करण्याचे, तसेच अवैधरीत्या वापरल्या जाणाऱ्या नौकांची व्हीआरसी रद्द करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
प्रत्यक्षात मासेमारी करणाऱ्या हजारो नौकांपैकी बऱ्याच विनापरवाना आहेत. या सर्व नौकांची तपासणी मोहीम फिशरीजकडून सुरू करण्यात आली आहे. मासेमारी बंद कालावधीत नौका तपासणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय विभागास देण्यात आल्या आहेत.
मच्छिमार नौकेस वेगळा परवाना असताना त्यावरून पर्ससिननेटची मासेमारी केली जात असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर परवाना, तसेच व्हीआरसी रद्दची कारवाई केली जाणार आहे. मच्छिमारांनी परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास त्यांचा डिझेल कोटा १ आॅगस्टपासून बंद केला जाणार आहे.
मत्स्य व्यवसाय विभागाने हाती घेतलेल्या नौका तपासणी मोहिमेत नौका सुस्थितीत आहे का? यांत्रिक नौकांना फ्लोरोसंट आॅरेंज रंग काढण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मच्छिमारांनी याची कार्यवाही केली का? नौकांचे क्रमांक, नौकामालकाचे नाव, छायाचित्र यासह अन्य महत्त्वाच्या बाबींची नोंद घेतली जाणार असून जिल्ह्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १३६७ नौकाधारक
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बिगर यांत्रिक नौका- तीन टनाखालील- ११२३, तीन टनावरील- २४४ असे मिळून एकुण १३६७ नौकाधारक आहेत.


३४ मासळी उतरविण्याची केंद्रे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ६ हजार ९३९ इतकी मच्छीमार संख्या आहे. तर मासळी उतरविण्याची केंद्रे ३४ आहेत. नौका तपासणी सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील अधिकृत माहिती प्राप्त होणार आहे. सध्या नौका तपासणीची मोहीम युद्धपातळीवर सुरू असून १ आॅगस्टनंतर याबाबतची अधिकृत आकडेवारी जाहीर होणार आहे.

यांत्रिक मासेमारी नौका
एक सिलिंडरच्या- ३७३, दोन सिलिंडरच्या- ४८२, तीन सिलिंडरच्या- १२, चार सिलिंडरच्या- ५०, सहा सिलेंडरच्या- ४८०, आऊटबोट नौका- ६८७

...तर कडक कारवाई करणार
वरिष्ठांच्या आदेशानुसार मासेमारी बंद कालावधीत तिन्ही तालुक्यांतील किनारपट्टीवरील गावांमध्ये मच्छीमारांच्या नौकांची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मासेमारी हंगाम सुरू होण्यापूर्वी ही पाहणी पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेमुळे अनधिकृत नौका किती आहे, हे स्पष्ट होणार आहे. मच्छीमार रितसर परवान्यासाठी अर्ज करतील, त्यांना परवाना उपलब्ध करून दिले जातील. १ आॅगस्टपासून हंगाम सुरू होणार आहे. विनापरवाना मासेमारी करताना मिनी पर्ससिन, पर्ससिननेटधारक किंवा अन्य मच्छीमार आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नौका तपासणी मोहिमेदरम्यान मच्छिमार बांधवांनी मत्स्य विभागाला सहकार्य करावे.
- सुगंधा चव्हाण, मत्स्य व्यवसाय आयुक्त, मालवण

Web Title: Action will be taken against unauthorized ships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.