मोठ्या मनाचा कृतिशील राजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:19+5:302021-03-30T04:22:19+5:30
दिलदार मित्र, खंबीरपणे पाठराखण करणारा नेता, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, राजाला साजेसे मन, सालस, शांत परंतु तितकेच खंबीर नेतृत्व… दुनिया बदलली ...
दिलदार मित्र, खंबीरपणे पाठराखण करणारा नेता, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व, राजाला साजेसे मन, सालस, शांत परंतु तितकेच खंबीर नेतृत्व… दुनिया बदलली परंतु कधीही त्यांचे आचार, विचार, वाणी आणि कृती यांत बदल झाला नाही, होणारही नाही. विकासाचा ध्यास घेऊन सदैव कृतिशील राहिलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने सातारा पालिकेचे माजी उपाध्यक्ष, नगरसेवक अविनाश कदम यांनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत…
सातारा-जावळीच्या विकासाचे स्वप्न घेऊन कायम कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व, एक सुसंस्कृत नेतृत्व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व मी गेली २५ वर्षे एकत्र आहोत. अनेक लहान-मोठ्या प्रसंगात मी त्यांना धीराने तोंड देताना पाहिले. नेहमी कायद्याचा आदर राखत गेले. कायद्याला सोडून आपल्याला उचापती करायच्या नाहीत, असे कार्यकर्त्यांच्या मनावर त्यांनी आग्रहाने बिंबवलं. तथापि, अन्यायाच्या विरोधात ते नेहमीच कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. प्रसंगी रुद्रावतारही धारण केला. समोर कोणीही कितीही मोठा असू दे, त्याला न डगमगता शिवेंद्रसिंहराजे पाय रोवून कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहतात. कार्यकर्त्यांना त्यांनी नेहमीच अशा बिकट प्रसंगात ताकद दिली, देत राहिले. सोबतच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ही समाजकारणात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. गैरविश्वास हा कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करत असतो. शिवेंद्रसिंहराजे याला अपवाद आहेत. सामाजिक जबाबदारी कार्यकर्त्यांच्या खांद्यावर देत असताना त्याला गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत ज्या ज्या ठिकाणी अडचण येईल, तिथ तिथं ते स्वत:चा शब्द खर्च करतात, वेळ देतात. कास धरण उंचीवाढीच्या कामात वनविभागाच्या भोपाळ मुख्यालयापर्यंत टक्कर देत असताना बाबाराजेंचा पाठपुरावा आणि पाठबळ निर्णायक ठरलं.
दूरदर्शीपणाचा वारसा
स्वर्गीय अभयसिंहराजे ऊर्फ भाऊसाहेब महाराज यांचा वैचारिक वारसा चालवताना त्यांच्याच सारखं बाबाराजेंना व्हिजन आहे. कास धरण उंचीवाढ असो, सातारा शहराची हद्दवाढ असो अगर वैद्यकीय महाविद्यालय असो. दूरदर्शीपणाची त्यांना निसर्गदत्त देनच भाऊसाहेब महाराजांकडून मिळाली आहे. आपल्या शहराची भविष्यकालीन गरज हेरून त्याप्रमाणे नियोजन करून काटेकोर अंमलबजावणी करण्यावर त्यांचा कायम कटाक्ष असतो. कास धरण उंचीवाढीचा प्रस्ताव तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून मंजूर करून आणताना त्याचा प्रत्यय आला. सध्याच्या क्षमतेच्या पाचपट पाणीसाठा वाढेल; ज्यामुळे सातारा शहरासह (नगरपालिका हद्द) भविष्यात विस्तारणाऱ्या नागरी भागाची पाण्याची गरज पुढील ४० वर्षे तरी भागेल, असे नियोजन त्यांनी अधिकाऱ्यांकडून करून घेतले. आज कास योजना मूर्त स्वरूपाला येत असताना अजितदादांबरोबर मंत्रालयातील पहिल्या बैठकीपासून ते वनविभागाच्या भोपाळ मुख्यालयातील अंतिम मान्यतेपर्यंत त्यांनी घेतलेल्या परिश्रमांचा मी एक साक्षीदार आहे. राष्ट्रीय हरित लवादाकडून कासला अंतिम मान्यता मिळेपर्यंत बाबाराजेंचा पाठपुरावा संपला नाही. अगदी कालपरवा कासच्या उर्वरित कामासाठी त्यांनी विरोधी पक्षात राहूनही निधी मंजूर करून आणला आणि निधीअभावी बंद पडलेले उंचीवाढीचे काम मार्गी लागले. विकासाचा ध्यास कशाला म्हणतात, हे या उदाहरणावरून स्पष्ट होण्यास पुरेसे आहे.
अजितदादांबरोबरची मैत्री कामी आली
सातारा शहराच्या हद्दवाढीचा ३५ वर्षे रेंगाळलेला विषय बाबाराजेंनी धसास लावला. त्यांचा कार्यकर्ता म्हणून हे सांगत नाही, तर समस्त सातारकर त्याचे साक्षीदार आहेत. राज्यातील विरोधी पक्षनेते व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी फडणवीस यांच्याकडून साताऱ्याच्या प्रलंबित हद्दवाढीचा शब्द घेतला. रात्रीत यंत्रणा हलली दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी निवडणूक आचारसंहिता लागली आणि निर्णय पुन्हा लटकला. याही ठिकाणी अजितदादांबरोबरची मैत्री कामी आली. विरोधी पक्षात असून, बाबाराजेंनी मुंबईला जाऊन त्यांच्याकडून हद्दवाढीच्या निर्णयावर अंतिम अधिसूचना आणली आणि वर्षानुवर्षे भिजत पडलेला प्रश्न सुटला. साताऱ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाबाबतही हेच पाहायला मिळाले. जागा हस्तांतरणाचा प्रश्न सुटला. शासनाने निधी मंजूर केला आणि आता नियोजित महाविद्यालयातील पदांनाही मान्यता मिळाली. साताऱ्याचं रूपडं पालटविण्यासाठी त्यांनी एमआयडीसीकडेही लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यात साताऱ्याची तरुणाई नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहराबाहेर जाऊ नये, हा त्यामागचा हेतू आहे.
मोठ्या मनाचा राजा
राजकारणात काम करणाऱ्या फार थोड्या नेतृत्वाकडे स्वत:ची निर्णय क्षमता असते. अशा अपवादांमध्ये बाबाराजे एक आहेत. कोणी कितीही आणि काहीही सांगितले तरी ते स्वत: निर्णय घेतात आणि एकदा निर्णय घेतल्यानंतर तो तडीस जाईपर्यंत ते पाठपुरावा करतात, हा माझाच नव्हे तर अनेकांचा अनुभव आहे. केवळ राजघराण्यात जन्माला आले म्हणून त्यांच्याकडे घराण्याचा वारसा नाही तर मोठ्या मनाचा, दिलदार मित्र, कुशल संघटक, दूरदृष्टी, कामातील सातत्य याचा वारसाही त्यांच्याकडे आहे.
कास उंचीवाढ, सातारा शहर हद्दवाढ, वैद्यकीय महाविद्यालय यांसारखेच अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. विकासरत्न स्व. अभयसिंहराजे यांचा केवळ कौटुंबिक वारसाच नव्हे तर त्यांचा वैचारिक आणि कृतिशील वारसा आमदार शिवेंद्रसिंहराजे चालवत आहेत. त्यांच्या पुढील संकल्पांना आई जगदंबा बळ देवो, याच वाढदिवसानिमित्त सदिच्छा!