सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारांवर; बेडचा ताळमेळ घालावा लागणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:34+5:302021-03-30T04:22:34+5:30
सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, दोन महिन्यात सक्रिय रुग्णांत मोठी वाढ झाली आहे, तर ...
सातारा : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, दोन महिन्यात सक्रिय रुग्णांत मोठी वाढ झाली आहे, तर अवघ्या पाच दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या ९०० ने वाढून तीन हजारांवर पोहोचली आहे. रुग्ण वाढतच जाणार असल्याने उपचार करण्यासाठी बेडचा ताळमेळ घालताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यातूनच खासगी रुग्णालयांचाही पर्याय समोर आला आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीला कोरोना बाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २० तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्णसंख्या जात होती. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. त्यातच मुंबई, पुणे येथील ट्रॅव्हल हिस्ट्री असणाऱ्यांमुळे ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत गेली. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली.
जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तर कोरोनाने कहर केला. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावर कोरोना बाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३८ हजार पार झाला. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले. ऑक्टोबर महिन्यात बाधितांचे प्रमाण एकदम कमी आले. अवघे ८१८४ रुग्ण सापडले. तर ३८७ जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी होते. तर बाधितांपेक्षा कोरोना मुक्त अधिक झाले. १३ हजार ७१३ कोरोनामुक्त झाले. प्रथमच कोरोना मुक्तचा आकडा वाढल्याने प्रशासनालाही दिलासा मिळाला.
नोव्हेंबर महिना तर आणखी दिलासादायक ठरला. जानेवारीपर्यंत तरी चांगली स्थिती होती. मात्र, फेब्रुवारीपासून रुग्ण संख्या पुन्हा वाढू लागली. फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांत २ हजार ४९१ नवीन रुग्ण स्पष्ट झाले. जानेवारीचा विचार करता जवळपास ११०० नवीन रुग्णांची भर पडली. तर ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे फेब्रुवारीत मृतांचा आकडाही १० ने वाढल्याचे दिसून आले. तर १ हजार ८५५ जण बरे झाले. मार्च महिन्यातही रुग्ण कमी न होता वाढले. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा वाढला आहे. कारण, कोरोना कहरनंतर २७ जानेवारीला सक्रिय रुग्ण अवघे ६५९ होते. त्यामुळे सर्वांनाच दिलासा मिळालेला. पण, बाधित वाढत गेले तसे सक्रिय रुग्ण संख्या वाढत गेली. मागील दोन महिन्यात अडीच हजारांवर सक्रिय रुग्ण वाढले आहेत. तर मागील पाच दिवसांत ९०० हून अधिक सक्रिय रुग्ण वाढले. त्यामुळे सध्या तीन हजारांवर सक्रिय बाधित आहेत. यामुळे उपचारासाठी आरोग्य केंद्रे तयार ठेवावी लागणार आहेत. त्यासाठी खासगी रुग्णालयांमध्येही सोय करावी लागणार आहे. तसेच होम आयसोलेशनचा पर्यायही आहे.
चौकट :
सध्या उपलब्ध बेडची स्थिती...
कोविड सेंटर, जम्बो आणि जिल्हा रुग्णालय मिळून...
ऑक्सिजन नसलेले बेड ६३२
ऑक्सिजनयुक्त बेड १६०९
आयसीयू बेड १७८
आयसीयूसह व्हेंटीलेटर बेड २८४
.....................................
कोरोना केअर सेंटर बेड क्षमता ४५०