Satara Politics: उंडाळकरांच्या 'रयत संघटने'चे कार्यकर्ते आता 'काकां'च्या काळातले राहिले नाहीत !

By प्रमोद सुकरे | Published: June 11, 2024 11:38 AM2024-06-11T11:38:36+5:302024-06-11T11:41:16+5:30

'कोयने'चे पेढे, 'रयत'- 'शिवनेरी'ची साखर आता त्यांना गोड वाटेना

Activists of Karad Dakshina Congress leader Uday Singh Patil work as rayat organization in politics | Satara Politics: उंडाळकरांच्या 'रयत संघटने'चे कार्यकर्ते आता 'काकां'च्या काळातले राहिले नाहीत !

Satara Politics: उंडाळकरांच्या 'रयत संघटने'चे कार्यकर्ते आता 'काकां'च्या काळातले राहिले नाहीत !

प्रमोद सुकरे

कराड : कराड दक्षिण काँग्रेसचे नेते, प्रदेश काँग्रेसचे चिटणीस अँड. उदयसिंह पाटील यांचे कार्यकर्ते कराड तालुक्याच्या राजकारणात 'रयत संघटना' म्हणून काम करतात.आता हे काही नवीन नाही. अगदी विलासराव पाटील उंडाळकर यांच्यापासून म्हणजे सन १९८० पासून हा प्रघात सुरु आहे. या संघटनेच्या जोरावर तालुक्यातील राजकारणात अनेक घडामोडी आजवर घडल्याचा इतिहास आहे. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रयत संघटनेने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला मिळालेली मते समोर आल्यापासून उदय 'दादा' रयत संघटनेचे कार्यकर्ते आता विलास 'काकां'च्या काळातले राहिले नाहीत. 'कोयने'चे पेढे, 'रयत'- 'शिवनेरी'ची साखर आता त्यांना गोड वाटेना अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आपल्या विजयाची 'सप्तपदी' पूर्ण करणारे आमदार, सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर प्रदीर्घकाळ आपला दबदबा ठेवणारे नेतृत्व म्हणजे विलासराव पाटील (काका)- उंडाळकर होय. 'काका बोले, कार्यकर्ते चाले अन दल हाले'अशी एकेकाळी परिस्थिती होती. आमची लढाई 'धनशक्ती विरुद्ध जनशक्ती' अशी आहे. असे ते आवर्जून सांगायचे. तर माझा कार्यकर्ता कोणत्याही प्रलोभनाला आणि दबावाला बळी पडणार नाही असा त्यांचा विश्वास ते बोलून दाखवायचे. तो विश्वास कार्यकर्त्यांनीही अनेकदा सार्थ करून दाखवला.

आता विलासराव पाटील - उंडाळकर यांच्या पश्चात त्यांचा वारसा पुत्र उदयसिंह पाटील चालवित आहेत. पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रयत संघटनेने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र मतांचा करिष्मा मात्र तसा पाहायला मिळला नाही. त्यामुळे रयत संघटनेचे कार्यकर्ते आता विलासकाकांच्या काळासारखे  राहिले नाहीत अशीच चर्चा आता राजकीय वर्तुळा सुरू झाली आहे.

दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या व्यासपीठावर

कराड तालुक्यातील रयत संघटनेचे कार्यकर्ते कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण अशा तीन मतदारसंघात विखुरलेले आहेत. या साऱ्यांचा एकत्रित मेळावा अँड. उदयसिंह पाटील यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत घेतला. तेव्हा 'तुतारी' वाजवण्याचा सामूहिक निर्णय झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी पाटण विधानसभा मतदारसंघातील रयत संघटनेचे काही शिलेदार मंत्री शंभूराज देसाई व युतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याबरोबर व्यासपीठावर दिसले.

श्रेय दुसऱ्याला जाणार म्हणून ..

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात रयत संघटनेच्या पदाधिकार्यांची मोठी संख्या आहे. पण आपण काम करूनही मताधिक्याचे श्रेय विद्यमान आमदारांना जाणार अशी भावना त्यांची झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे बाजार समिती व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपचे नेते मनोज घोरपडे यांच्याशी जुळलेली नाळ कायम ठेवण्यातच त्यांनी धन्यता मांनल्याची आता चर्चा आहे.

दक्षिणेत तर आकडे उलटे फिरले

कराड दक्षिण मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता तर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण व  उदयसिंह पाटील हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. त्यामुळे काही चिंता नाही अशीच कार्यकर्त्यांची धारणा होती. पण याच मतदारसंघात मतांचे आकडे उलटे फिरल्याचे दिसते. पहिल्यांदाच भाजपच्या उमेदवाराला ६१६ मतांची आघाडी या मतदारसंघातून मिळाली आहे. त्यामुळे रयत संघटनेची मते नेमकी गेली तरी कुठे? हा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

अंग झाडून काम ..

लोकसभा निवडणुकीला कराड दक्षिण भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी अंग झाडून काम केले. खरंतर मागील काळात कराड दक्षिणच्या राजकारणात भोसले व उंडाळकर गटांने अनेक वर्षे एकत्र काम केले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांचे ही अंगाला अंग लागले होते. याचाच फायदा अतुल भोसलेंनी या निवडणुकीत करून घेतलेला दिसतोय.आता रयत संघटनेचे कार्यकर्ते नेमके दबावाला, प्रलोभनांना की अन्य कशाला बळी पडले याचा शोध संघटनेच्या नेत्यांना  आता घ्यावा लागणार आहे.

Web Title: Activists of Karad Dakshina Congress leader Uday Singh Patil work as rayat organization in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.