आदर्कीच्या पर्जन्यमापकाला वारूळाचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:48 AM2021-07-07T04:48:16+5:302021-07-07T04:48:16+5:30
आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, पाऊस, वादळ, पर्जन्यमान समजण्यासाठी स्वयंचलीत पर्जन्यमापक महसूल व कृषी ...
आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, पाऊस, वादळ, पर्जन्यमान समजण्यासाठी स्वयंचलीत पर्जन्यमापक महसूल व कृषी विभागाने बसवले आहे. पण त्याची देखभाल होत नसल्याने आदर्कीच्या पर्जन्यमापकास वारूळाचा वेढा पडल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण तालुक्यातील आदर्की महसूल मंडलातील बिबी, घाडगेवाडी, सासवड, हिंगणगाव, शेरेचीवाडी, कापशी, आळजापूर, आदर्की खुर्द, टाकोबाईचीवाडी, वडगाव, कोऱ्हाळे, वाघोशी गावांत पाऊस किती पडला याची नोंद महसुली दप्तरी होण्यासाठी आदर्की बुद्रूक येथील जुनी ग्रामपंचायत इमारतीच्या छतावर व भैरवनाथ मंदिरावर ठेवले आहे. त्यांच्यावर अचूक पर्जन्यमान मोजले जात नव्हते. त्याला पर्याय म्हणून आदर्की बुद्रुक येथील मठाजवळ स्वयंचलित पर्जन्यमापक बसवले आहे. यामुळे महसूल व कृषी खात्याबरोबर शासनाला पाऊस, वादळ, हवामानातील बदल याचा अचूक अंदाज येऊ लागल्याने शेतकरी पीक पद्धतीत बदल करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. यामुळे आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे. पण महसूल व कृषी विभागाने स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्राकडे दुर्लक्ष केले. त्यातच गेल्या महिन्यात गाजरगवत वाढले. यामुळे पर्जन्यमापक दिसत नव्हते. त्यावर ग्रामसभेत चर्चाही झाली होती. तेव्हा कृषी सहायक अडसूळ यांनी ‘आमचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करून जातात, पण त्याची देखभाल, स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र निधी व मनुष्यबळ नाही. आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत,’ असे सांगितले होते.
त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तननाशक फवारून गाजरगवत जळून गेले, पण पर्जन्यमापक यंत्राला दोन फूट उंच मातीच्या वारूळाला वेढा घातला आहे. तो मात्र जैसे थे असल्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
पर्जन्यमापकामुळे शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई, अवकाळी, वादळी पाऊस, अतिवृष्टी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. शासनाने हजारो रुपये खर्चूनही पर्जन्यमापकाकडे दुर्लक्ष होत आहे,’ असा आरोप शिवसेनेच्या ग्राहक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत बासर
यांनी केला आहे.
फोटो ०६आदर्की-रेन
आदर्की बुद्रुक येथील स्वयंचलित पर्जन्यमापकास वारूळाचा वेढा पडला आहे. यामुळे हवामानाचा अंदाज मिळत नाही.