आदर्कीच्या पर्जनमापकाला वारूळाचा वेढा, देखभालीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 11:01 AM2021-07-08T11:01:56+5:302021-07-08T11:04:25+5:30
Rain Satara : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, पाऊस, वादळ, पर्जनमान समजण्यासाठी स्वयंचलीत पर्जन मापक महसूल व कृषी विभागाने बसवले आहे. पण त्याची देखभाल होत नसल्याने आदर्कीच्या पर्जनमापकास वारूळाचा वेढा पडल्याचे चित्र दिसत आहे.
सूर्यकांत निंबाळकर
आदर्की : फलटण तालुक्यातील आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना हवामानातील बदल, पाऊस, वादळ, पर्जनमान समजण्यासाठी स्वयंचलीत पर्जन मापक महसूल व कृषी विभागाने बसवले आहे. पण त्याची देखभाल होत नसल्याने आदर्कीच्या पर्जनमापकास वारूळाचा वेढा पडल्याचे चित्र दिसत आहे.
फलटण तालुक्यातील आदर्की महसूल मंडलातील बिबी, घाडगेवाडी, सासवड, हिंगणगाव, शेरेचीवाडी, कापशी, आळजापूर, आदर्की खुर्द, टाकोबाईचीवाडी, वडगाव, कोऱ्हाळे, वाघोशी गावात पाऊस किती पडला याची नोंद महसुली दप्तरी होण्यासाठी आदर्की बुद्रूक येथील जुनी ग्रामपंचायत इमारतीच्या छतावर व भैरवनाथ मंदिरावर ठेवले आहे. त्यांच्यावर अचुक पर्जनमान मोजले जात नव्हते त्याला पर्याय म्हणून आदर्की बुद्रुक येथील मठाजवळ स्वयंचलीत पर्जनमापक बसवले आहे.
यामुळे महसूल व कृषी खात्याबरोबर शासनाला पाऊस, वादळ, हवामानातील बदल याचा अचूक अंदाज येऊ लागल्याने शेतकरी पिक पद्धतीत बदल करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले. यामुळे आदर्की महसुली मंडलातील शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला आहे. पण महसूल व कृषी विभागाने स्वयंचलीत पर्जनपाक यंत्राकडे दुर्लक्ष केले. त्यातच गेल्या महिन्यात गाजर गवत वाढले.
यामुळे पर्जमापक दिसत नव्हते. त्यावर ग्रामसभेत चर्चाही झाली होती. तेव्हा कृषी सहायक अडसुळ यांनी आमचे वरिष्ठ अधिकारी पाहणी करून जातात पण त्याची देखभाल, स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र निधी व मनुष्यबळ नाही. आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत, असे सांगितले होते.त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी तननाशिक फवारुन गांजर गवत जळुन गेले पण पर्जमापक यंत्राला दोन फुट उंच मातीच्या वारुळाला वेढा घातला आहे. तो मात्र जैसे थे असल्याचे चित्र दिसत आहे.
पर्जन मापकामुळे शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई, अवकाळी, वादळी पाऊस, अतिवृष्टी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते. शासनाने हजारो रुपये खर्चुनही पर्जनमापकाकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप शिवसेनेच्या ग्राहक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष हणमंत बासर यांनी केला आहे.