उडतारे गावाचा उत्तरप्रदेशमध्ये समावेश करावा
By Admin | Published: May 2, 2017 06:46 PM2017-05-02T18:46:01+5:302017-05-02T18:46:01+5:30
ग्रामसभेचा ठराव : महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशचे सरकार शेतकऱ्यांबाबतीत संवेदनशील
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 0२ : वाई तालुक्यातील उडतारे या गावाचा शेतकऱ्यांना कर्जमाफी देणाऱ्या उत्तरप्रदेश राज्यात समावेश करावा, अशी खळबळजनक मागणी १ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आली.
महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच स्वप्नील निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत शेतकरी कर्जमाफीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गेल्या अडीच वर्षांत शेती उत्पादनाला भाव नाही, पिकावर खर्च केलेले भांडवलदेखील परत मिळत नाही. अशात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने वर्षभर शेतीसाठी पाणी मिळणे अशक्य झाले आहे. उडतारे परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिके घेतात. मात्र, पाणीटंचाईमुळे नगदी पिकाची लागवड करणे अशक्य झाले आहे.
कडधान्य, गळिताची धान्ये, तृणधान्य यातील कशालाही भाव मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे. त्यात अनेक सहकारी, सरकारी बँकांच्या कजार्चा डोंगर डोक्यावर आहे, म्हणून ग्रामस्थांनी १ मेच्या ग्रामसभेत तीन ठराव मंजूर केले आहेत. कुणाल सुनील बाबर यांनी ठराव मांडला. प्रवीण तानाजी पवार यांनी त्या ठरावाला अनुमोदन दिले.
गेले अनेक दिवस शेतकरी कर्जमाफीसाठी मायबाप सरकारकडे आस लावून बघत आहे; परंतु पदरी निराशाच पडत आहे. जर महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास असमर्थ असेल तर शेतकऱ्यांची संवेदनशीलता जाणून घेऊन उत्तरप्रदेश राज्यात कर्जमाफी जाहीर केली आहे. उडतारे गावाचा समावेश शेतकऱ्यांची संवेदनशीलता जाणणाऱ्या उत्तरप्रदेश राज्यात व्हावा, या मागणीला ग्रामसभेने मंजुरी दिली.
ग्रामसभेत मंजूर झालेले ठराव
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी.
- शेती उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के अधिक हमीभाव द्यावा.
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात.