दारूमुक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्त युवक संघाचे पाऊल !
By admin | Published: June 26, 2017 02:03 PM2017-06-26T14:03:01+5:302017-06-26T14:03:01+5:30
मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांकडूनही सह्यांच्या मोहिमेला प्रतिसाद
आॅनलाईन लोकमत
शिरवळ (जि. सातारा), दि. २६ : भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची, उभी पंढरी आज नादावली.., तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी, जीवाला तुझी आस गा लागली... जरी बाप साऱ्या जगाचा परी तू.. आम्हा लेकरांची विठू माउली.. माउली .. माउली... माउली रूप तुझे..! या भक्तीपूर्ण ओव्यांप्रमाणे पंढरीच्या विठुरायाला साक्षी ठेवून आता घुमु द्या एकच नारा.. दारूमुक्त करूया महाराष्ट्र सारा..! हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील दारुबंदीसाठी पाच लाख सह्यांचे निवेदन मुख्यमुत्र्यांना देण्यात येणार आहे.
व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्रच्यावतीने दारूमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी व्हावी याकरिता सह्यांचे अभियान राबिवण्यात येत आहे.
यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी व्हावी याकरिता सुमारे पाच लाख सह्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार असल्याचा निश्चय व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आला आहे. यामध्ये व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्त्यांनी पंढरीच्या विठु माउलीच्या साक्षीने या चांगल्या उपक्रमाची सुरवात व्हावी याकरिता संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला आहे.
यावेळी व्यसनमुक्त युवक संघाच्या दारूमुक्त महाराष्ट्र अभियानाला वारकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आळंदी ते लोणंद या वारीच्या टप्प्यामध्ये सुमारे ६० हजारांच्या आसपास सह्या देत या अभियानाला जोरदार पाठिंबा दर्शवला.
येत्या काही काळामध्ये सुमारे ५ लाख सह्या घेऊन व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दारूबंदी होण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १००० गावांमधून २० तालुके तसेच दहा जिल्ह्यांची निवड व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
संस्कार सोहळ्यात दारूतून सुटका...
व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या संस्कार सोहळ्यामध्ये दोन ते तीन हजार नागरिक दारूतून सुटका करून घेत असतात. या अभियानामध्ये भानुदास वैरट, दादा पाचपुते, राजेंद्र कानडे, विजय बंडगर, हनुमंत सकपाळ, जगनाथ शिंदे यांच्यासह अनेक युवक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.