जुळे भाऊ दहावीच्या निकालातही ‘सेम टू सेम’-पालकांसह शिक्षकही अवाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 12:01 AM2018-06-09T00:01:32+5:302018-06-09T00:01:32+5:30
प्रमोद सुकरे ।
कऱ्हाड : जुळी भावंडे सेम टू सेम दिसतात आणि त्याच साऱ्यांनाच कुतूहल असतं. या जुळ्या भावंडांच्या आवडी निवडीही एकसारख्या पाहायला मिळतात. त्यांचं चालणं बोलणंही एकसारखं दिसतं; पण अशा जुळ्या भावांना दहावीच्या परीक्षेतही सेम टू सेम गुण मिळाले तर...
एखाद्या चित्रपटाला साजेशी ही कहाणी नाही. तर कºहाडच्या श्रीवर्धन आणि यशोवर्धन या जुळ्या भावांनी वास्तवात दहावीच्या परीक्षेत मिळवलेले यश सर्वांनाच थक्क करणारे आहे. येथील होली फॅमिली स्कूल व चाटे क्लासेसचे विद्यार्थी असणारे श्रीवर्धन पाटील व यशोवर्धन पाटील या जुळ्या भावंडांनी दहावीच्या परीक्षेत ९८.२० टक्के असे समान गुण मिळवून सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या या सेम टू सेम गुणांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
चंद्रकांत पाटील आणि स्वाती पाटील हे दाम्पत्य कºहाडमध्ये वास्तव्य करते. हे दोघेही भारती विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची मोठी मुलगी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. श्रीवर्धन आणि यशोवर्धन ही जुळी मुले यंदा दहावीत होती. शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर झाला आणि विशेष म्हणजे या जुळ्या भावंडांना निकालात एकसारखे गुण पाहायला मिळाले.
श्रीवर्धन आणि यशोवर्धन या जुळ्या भावंडांचा जन्म २१ जानेवारी २००२ रोजी झाला. लहानपणापासूनच दोघेही हुशार असल्याचे पालक सांगतात. म्हणून तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यशोवर्धन राज्यात पंधरावा तर श्रीवर्धन जिल्ह्यात पहिला आला होता. तसेच एनटीएसई या परीक्षेत यशोवर्धन याने देशात सातवा क्रमांक मिळवला होता.
इयत्ता नववीमध्ये झालेल्या होमी भाभा एम सायंटिस्ट या परीक्षेत दोघांनाही सुवर्णपदक मिळाले होते. तर आता दहावीच्या परीक्षेत या दोघांनाही समान गुण मिळाले आहेत. हा योगायोगच मानावा लागेल. श्रीवर्धन आणि यशोवर्धनच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आमची दोन्ही मुले शांत स्वभावाची आहेत. दहावीच्या परीक्षेत मिळालेले यश हे त्यांच्या कष्टाचे फळ आहे. आम्ही त्यांचा कधी होमवर्कही घेतला नाही. त्यांचे अभ्यासाचे वेळापत्रक त्यांनी स्वत:च तयार केले होते. त्यांना मिळालेल्या यशामुळे आम्ही आनंदीत झालो आहोत.
-प्रा. स्वाती चंद्रकांत पाटील