कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवक वर्गावर अतिरिक्त ताण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:03+5:302021-04-14T04:35:03+5:30
किडगाव : कण्हेर (तालुका सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने आतापर्यंत आदर्शवत काम केले असून अविरतपणे रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेला ...
किडगाव : कण्हेर (तालुका सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने आतापर्यंत आदर्शवत काम केले असून अविरतपणे रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेला येथील स्टाफ सदैव रुग्णांच्या सेवेसाठी तयार असतो. कोरोना कालावधीमध्ये येथील आरोग्य अधिकारी आणि सेवक वर्गाने अविरतपणे रुग्णांची सेवा केली. सध्या लसीकरणाची जोरदार मोहीम सुरू आहे. मात्र सेवक वर्ग कमी असल्याने उपलब्ध असलेल्या सेवक वर्गाची हे काम करत असताना पूर्णपणे दमछाक होत आहे. लसीकरणाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची नोंदणी करून रजिस्ट्रेशन करणे, त्यांना लस देणे ही कामे करावी लागत आहेत.
कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सहा उपकेंद्रे येतात. ज्यामध्ये कामथी, धावडशी, वर्ये, वेण्णनगर, कोंडवे ही उपकेंद्रे जोडलेली आहेत. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. आरोग्य सेविकांची संख्या चार आहे, तर आरोग्य सहायकाची एकूण पदे चार असून त्यामधील दोन पदे गेले कित्येक दिवस रिक्तच आहेत. शिपाई पदाच्या जागा एकूण चार असून त्यामधील एक जागा अद्यापही रिकामीच आहे. कोंडवे आणि धावडशी या उपकेंद्रातील आरोग्य सेवक पद हे रिकामे असल्याने त्या ठिकाणी कामे खोळंबलेली असतात. २१ हजार लोकसंख्येचा भार संभाळणारे वर्ये उपकेंद्रातील आरोग्य सेविकेचे पद गेल्या दोन वर्षापासून रिक्त आहे, तर कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविकेचे पदही रिकामेच आहे. कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रात क्लार्क पद रिकामे असल्याने लसीकरणाच्या वेळेला या ठिकाणी मोठी अडचण होत असून उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवक अथवा सेविकेमार्फत हे ऑनलाईन काम सध्या पार पाडले जात आहे.
सातारा शहराची हद्दवाढ ज्यावेळेला झाली, त्यावेळी शाहूपुरी आणि दरे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कामे ही सातारा नगरपालिकेने करायला हवी होती. तसा पत्रव्यवहारही झाला होता. मात्र नगरपालिकेने आपणाकडे आरोग्य कर्मचारी कमी असल्याने या विभागातील आरोग्याचे काम कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राने पाहावे, असा पत्रव्यवहार केल्याने ४० हजार लोकसंख्येची कामे याच प्राथमिक आरोग्य केंद्राला अद्यापही करावी लागत आहेत. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रातीलही अतिरिक्त कामाचा ताण या प्राथमिक आरोग्य केंद्रावर आलेला आहे.
सद्यपरिस्थितीत कोरोना काळात या सेवक वर्गाला इतर कामे असल्याने सेवक वर्ग थकून गेलेला आहे.
शासनस्तरावर आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरून, या ठिकाणच्या सेवक वर्गावर असलेला अतिरिक्त ताण कमी करावा, तसेच सातारा नगरपालिकेच्या हद्दीत शाहूपुरी ग्रामपंचायत आणि दरे खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील आरोग्याची सर्व जबाबदारी नगरपरिषदेने उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ReplyReply to allForward