खरीप हंगामासाठी खताचा पुरेसा अन् संरक्षितही साठा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:42 AM2021-04-28T04:42:38+5:302021-04-28T04:42:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी विभागाकडून खते आणि बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : खरीप हंगाम तोंडावर आला असून कृषी विभागाकडून खते आणि बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. हंगामासाठी १ लाख ६० हजार मेट्रिक टन रासायनिक खत साठा उपलब्ध होणार आहे. तसेच खताचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथके असतील, तर युरियाची समस्या निर्माण होते यासाठी संरक्षित साठा जिल्हा स्तरावर ठेवला जाणार आहे. नियोजनामुळे बळिराजाला कोणतीही अडचण येणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.
जिल्ह्यात जून महिन्यापासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होते. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचा असतो. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असते. जिल्ह्यात खरीप हंगाम सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरवर असते. या हंगामात बाजरी, भात, सोयाबीन, ज्वारी, नाचणी, भुईमूग या प्रमुख पिकांबरोबरच तूर, उडीद, मूग तसेच इतर कडधान्ये घेण्यात येतात. बाजरी आणि सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक राहते. गेल्यावर्षी बाजरीचे सर्वसाधारण क्षेत्र ६४ हजार, तर सोयाबीनचे ६३ हजार ७०० हेक्टरवर होते, तर भाताचे सर्वसाधारणपणे ४९ हजार आणि भुईमूगचे ३८ हजार हेक्टरवर क्षेत्र होते, तर इतर पिकांचे क्षेत्र कमी प्रमाणात होते.
जून महिन्यापासून खरीप हंगाम सुरू होतो. त्यातच वेळेत पाऊस झाला तर पेरणीची लगबग सुरू होते. याचा विचार करून कृषी विभाग दोन महिने अगोदर खत आणि बियाण्यांचे नियोजन करतो. यावर्षीही कृषी विभागाचे नियोजन झालेले आहे. कृषी विभागाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी १ लाख ३० हजार मेट्रिक टन रासायनिक खत साठ्याची मागणी केली आहे, तर शासनाकडून १ लाख १७ हजार ७३० मेट्रिक टन खत साठा मंजूरही झाला आहे. त्याचबरोबर सध्या ४२ हजार ६२२ मेट्रिक टन साठा शिल्लक आहे. यामुळे खरीप हंगामासाठी सर्व मिळून १ लाख ६० हजार ३५२ मेट्रिक टन खत साठा उपलब्ध होणार आहे. परिणामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासणार नाही, असा विश्वास कृषी विभागाला आहे.
चौकट :
युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा मंजूर...
खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते कमी पडू नयेत, वितरण विस्कळीत होऊ नये यासाठी जिल्हास्तरावरून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच खत टंचाई भासू नये, काळाबाजार होऊ नये यासाठी भरारीपथके आणि नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. त्याचबरोबर खरिपात युरिया खताची मागणी अधिक असते. त्यामुळे समस्या निर्माण होतात. यासाठी ५० हजार मेट्रिक टन युरिया खताचा साठा जिल्ह्यासाठी मंजूर झाला आहे, अशी माहितीही कृषी विभागातून देण्यात आली.
.........................................
कोट :
खरीप हंगामासाठी खताचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. विशेषत: युरियाची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून ४५०० मेट्रिक टन संरक्षित साठाही जिल्हास्तरावर ठेवण्यात येणार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, असे नियोजन आहे.
- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.
......................................................