रस्त्यांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:35+5:302021-03-04T05:13:35+5:30
खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनात दरवर्षी १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा ...
खासदार श्रीनिवास पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात रस्ते अपघातांच्या घटनात दरवर्षी १२ हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू होतो. तर अनेकजण गंभीर जखमी होत असतात. राज्य सरकार राज्यातील रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. सर्व रस्ते दुर्घटनांपैकी ६० टक्क्यांहून अधिक लोक पादचारी व दुचाकीस्वार अशा असुरक्षित रस्ते वापरकर्त्यांपैकी असल्याचे आढळून येते. शिवाय क्रॅश डेटा विश्लेषणावरून असे दिसून येते की, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, प्रमुख जिल्हामार्ग, इतर जिल्हामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास चौकांच्या ठिकाणी अनेक प्राणघातक अपघात होत आहेत. याचे मुख्य कारण त्याठिकाणी असलेली अपुरी प्रकाश व्यवस्था ही होय. त्यामुळे असे होणारे अपघात टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून चौक परिसरात योग्य प्रकाश ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्यावेळी अंधार असेल तेव्हा हायमास्ट दिवे लावण्यात यावेत. तसेच वीज शुल्क आणि नियमित देखभाल दुरुस्तीची देखील तरतूद करून असे हायमास्ट पोल स्थापित करणे गरजेचे आहे. स्थानिक ग्रामपंचायती व छोट्या नगरपरिषद ह्या अशा सुविधा बसविण्यासाठी व देखभाल करण्यासाठी आर्थिक सुस्थितीत नाहीत. तर वाढते अपघात आणि त्यात होणारे मृत्यू ही चिंताजनक बाब आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या कामासाठी विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा. याशिवाय एनएचएआयला त्यानुसार काम पार पाडण्यासाठी सूचना कराव्यात अशी मागणी केली आहे.