‘अर्जुन पुरस्कार’ मिळविण्याचे बाळगलेले स्वप्न साकार- आदिती स्वामी

By दीपक शिंदे | Published: December 21, 2023 01:39 AM2023-12-21T01:39:49+5:302023-12-21T01:40:37+5:30

जागतिक पातळीवर लौकिक मिळविणारी साताऱ्याची पहिली महिला तिरंदाज

Aditi Swamy's dream of winning 'Arjuna Award' came true | ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविण्याचे बाळगलेले स्वप्न साकार- आदिती स्वामी

‘अर्जुन पुरस्कार’ मिळविण्याचे बाळगलेले स्वप्न साकार- आदिती स्वामी

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली. क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च अर्जुन पुरस्कार मिळविण्याचे स्वप्न उराशी बाळगून खेळातील वाटचाल सुरू ठेवली होती. ते स्वप्न साकार झाल्याची प्रतिक्रिया आदितीने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली आहे.

आदिती ही अत्यंत कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. २०२३ मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच वरिष्ठ पातळीवरील तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली. जागतिक करंडक स्पर्धेत २००६ नंतर सुवर्णपदक मिळवणारी ती सर्वांत लहान वयाची खेळाडू ठरली होती. आदितीने भारताला १४ वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये ७२० पैकी ७११ गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

माझं स्वप्न होत की, मला ‘अर्जुन’ पुरस्कार घ्यायचाच आहे; पण मला जेव्हा समजले की देशातील खेळाडूंच्यासाठी दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अर्जुन पुरस्कार मला जाहीर झाला तेव्हा मला खूप आनंद झाला. हा पुरस्कार ज्यांच्यामुळे मला मिळाला, त्यामध्ये तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षक प्रवीण सावंत आणि माझ्या आई-वडिलांचा खूप मोठा वाटा आहे.
-आदिती स्वामी, अर्जुन पुरस्कार विजेती, तिरंदाज

आदिती स्वामीची कामगिरी

  • आशियाई गेम्स २०२२ चीन - १ सुवर्ण, १ कांस्यपदक
  • आशियाई चॅम्पियनशिप बँकॉक - २ सुवर्णपदक
  • युथ चॅम्पियनशिप - आयर्लंड (लीमरिक) २ सुवर्णपदक
  • वर्ल्ड सीनियर चॅम्पियनशिप जर्मनी (बर्लिन) - २ सुवर्णपदक
  • वर्ल्ड कप १ अंटलिया (टर्की)

Web Title: Aditi Swamy's dream of winning 'Arjuna Award' came true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.