साताऱ्यातील तरुणाने कंठावर गोंदली बाबासाहेबांची स्वाक्षरी, विचार समाजमनात रुजविण्याचा उचलला विडा
By सचिन काकडे | Published: January 15, 2024 06:13 PM2024-01-15T18:13:36+5:302024-01-15T18:18:02+5:30
गेल्या पाच वर्षांपासून चळवळीत करतोय काम
सातारा : अलिकडच्या काही वर्षांत तरुणाईमध्ये ‘टॅटू’ संस्कृती रुजू लागली आहे. कोणी आपल्या हातावर आई-वडिलांचा फोटो तर कोणी आवडत्या व्यक्तीचे नाव टॅटूने काढतो. मात्र, साताऱ्यात राहणाऱ्या आदित्य गायकवाड या तरुणाने आपल्या कंठावर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी कोरून त्यांचे विचार समाजमनात रुजविण्याचा विडा उचलला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साताऱ्याचे ऋणानुबंधाचे नाते होते. येथील छ. प्रतापसिंह हायस्कूलमध्ये त्यांचे पाऊल पडलेच नसते तर ते सुशिक्षित व प्रज्ञावंत होणे शक्य नव्हते. महत्त्वाचे म्हणजे जगात ज्याचे आजही स्वागत केले जाते ते लोकशाहीप्रधान संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून निर्माण झाले नसते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा संदेश देणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी, त्यांचे विचार समाजमनात रुजविण्यासाठी व गोरगरिबांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी साताऱ्यातील आदित्य गायकवाड गेल्या पाच वर्षांपासून चळवळीत काम करत आहेत. आपल्या कंठावर बाबासाहेबांची स्वाक्षरी टॅटूने कोरावी, अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि त्याने ती सत्यात उतरविली. त्याची ही स्वाक्षरी अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे.
बाबासाहेबांच्या शिक्षणाचा प्रवास साताऱ्यातून सुरू झाला. त्यांनी बहुजनांना खऱ्या अर्थाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. अशा महामानवाचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. मात्र, त्यांचे कार्य तळागाळात निश्चितच पोहचवू शकतो. यासाठीच कंठावर बाबासाहेबांची स्वाक्षरी कोरली असून, ती प्रेरणा व काम करण्याचे बळ देते. - आदित्य गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष रिपाइं, गवई गट)