साताऱ्यात प्रशासन अलर्ट! ३६९ कुटुंबांचे स्थलांतर; पश्चिमेकडील गावांत सतर्कता, NDRFची टीम येणार
By नितीन काळेल | Published: July 20, 2023 07:43 PM2023-07-20T19:43:31+5:302023-07-20T19:43:41+5:30
अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दरडप्रवण भागातील ३६९ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे.
सातारा: अतिवृष्टीच्या पाश्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून संभाव्य दरडप्रवण भागातील ३६९ कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर करण्यात आले आहे. साताऱ्यासह वाई, पाटण, जावळी आणि महाबळेश्वर या पश्चिमेकडील तालुक्यातील हे नागरिक आहेत. त्यांना शाळा, निवारा शेड, मंदिरात हलिवण्यात आले असून अन्न, शुध्द पाण्यासह महत्वाच्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच दोन दिवसांत जिल्ह्यात एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यातच पुढील पाच दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमिवर राज्य शासन तसेच जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनीही गुरुवारी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून सूचना केली. यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी रस्ते खचत असून पूल वाहून जात आहेत. दरडी कोसळू लागल्याने प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन संवेदनशील ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करावे अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनीही पाटण तालुक्यातील अनेक गावांना भेट देऊन आढावा घेतलेला आहे. तसेच तेथील अधिकाऱ्यांना अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे.
या पार्श्वभूमिवर सध्या जिल्हा प्रशासनाने धोकादायक गावातील कुटुंबांना तात्पुरते स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम भागातील पाच तालुक्यातील दरडप्रवण गावातील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. गुरुवारी स्थलांतरित कुटुंबीयांचा आकडा ३६९ झाला होता. यामध्ये पुढे आणखी वाढ होणार आहे.
स्थलांतरित कुटुंबीयांची माहिती...
- सातारा तालुका : मोरेवाडीतील १८, सांडवालीतील २० आणि भैरवगडमधील ६० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
- जावळी तालुका : बोंडारवाडी ६, भुतेघर येथील ३ कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. तसेच नरफदेव, रांजणी आणि धनगरपेढामधील नागरिकांना स्थलांरित होण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे.
- वाई तालुका : जोर गाव ८, गोळेगाव-गोळेवस्ती येथील ४ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आलेले आहे.
- पाटण तालुका : मिरगाव, हुंबरळी आणि ढोकावळे येथील १५० कुटुंबाचे तर म्हारवंडमधील ३५ कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.
- महाबळेश्वर तालुका : माचूतर, एरंडल, शिंदोळा, दुधोशी, दरे, चतूरबेट, मालूसर, येर्णे येथील ६५ कुटुंबे स्थलांतरित
जिल्ह्यात धोकादायक दरडप्रवण ४१ गावे...
- महाबळेश्वर तालुका : येरणे बुद्रुक, घावरी, मालुसरे, दरे, चिखली, चतूरबेट, नावली, येर्णे खुर्द, शिंदोळा, एरंडल, धावली, दुधोशी, भेकवलीवाडी, आचली, कुमठे (कामटवाडी)
- पाटण तालुका : आंबेघर तर्फ मरळी खालचे, आंबेघर तर्फ मरळी वरचे, ढोकावळे, हुंबरळी, मिरगाव, डावरी चोपडेवाडी, वरंडेवाडी, काहीर, दिक्षी, खुडुपलेवाडी, मेंढोशी बोर्गेवाडी, शिद्रुकवाडी (धावडे), जितकरवाडी (जिंती), धनवडेवाडी/शिंदेवाडी (निगडे), जोशेवाडी (कालगाव), बागलेवाडी, जुगाईवाडी, कुसावडे (पळसरी).
- वाई तालुका : कोंढावळे, जोर.
- जावळी तालुका : बोंडापरवाडी, भुतेघर, वहिटे.
- सातारा तालुका : सांडवली, बोंडारवाडी, भैरवगड (टोळेवाडी)
जिल्ह्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमिवर दरडप्रवण भागातील लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आलेले आहे. त्यांना अन्न, पाणी तसेच आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. सध्या पाऊस होत असल्याने दरडप्रवण भागात नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच प्रशासनासही सहकार्य करावे. लवकरच एनडीआरएफची टीमही दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारीst जितेंद्र डुडी यांनी दिली.