संस्थात्मक विलगीकरणासाठी प्रशासन सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:27 AM2021-05-31T04:27:48+5:302021-05-31T04:27:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मल्हारपेठ : कोरोना रुग्णांसाठीचे गृह अलगीकरण कमी करून आता संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी पाटण तालुक्यातील ...

The administration pushed for institutional separation | संस्थात्मक विलगीकरणासाठी प्रशासन सरसावले

संस्थात्मक विलगीकरणासाठी प्रशासन सरसावले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मल्हारपेठ : कोरोना रुग्णांसाठीचे गृह अलगीकरण कमी करून आता संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी पाटण तालुक्यातील प्रशासन सरसावले आहे. गावोगावी अशी कोरोना सेंटर स्थापन करण्यासाठी शासनाने पाटण तालुक्यात १५ पथके तयार केली आहेत. या पथकात स्वत: प्रांतधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांसह विविध विभागातील अधिकारी आणि शिक्षकांचा समावेश आहे.

पाटण तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसगार्मुळे बाधित होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोरोनाबाधित रुग्णांची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात आता गृह अलगीकरण करण्याऐवजी तीस बेडची संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पाटण तालुक्यात तातडीने पंधरा संस्थात्मक विलगीकरण पथके तयार केली आहेत. ही पथके मंडलनिहाय प्रत्येक गावात जाऊन तेथील बाधितांचे विलगीकरण करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये विलगीकरण कक्ष सुरू करणे, ग्रामस्तरीय समितीच्या सहकार्याने या विलगीकरण कक्षामध्ये गावातील कोरोनाबाधितांचे विलगीकरण करणे, जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव संबंधित रुग्णाच्या कुटुंबात व गावात होणार नाही तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणाऱ्या, सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतर न पाळणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ग्रामस्थांवर दंडात्मक कारवाई करणार आहेत.

- चौकट

मंडलनिहाय पंधरा पथके तैनात

पाटण तालुक्यात मंडलनिहाय एकूण १५ पथके तैनात केली असून, यामध्ये मारुल हवेली, मल्हारपेठ, हेळवाक, पाटण शहर, पाटण ग्रामीण, ढेबेवाडी, कुठरे, मरळी, तळमावले, म्हावशी, तारळे, मोरगिरी, आवर्डे, येराड व चाफळ या मंडलांचा समावेश आहे. दोन दिवसांपासून ही पथके तालुक्याच्या प्रत्येक गावात फिरू लागली आहेत.

- चौकट

मरळी मंडलामध्ये कार्यवाही सुरू

मरळी मंडलात गव्हाणवाडी, चोपदारवाडी, मरळी, डावरी, जंगमवाडी, धडामवाडी, कळकेवाडी, कुसरूंड, आडदेव, कोदळ, सुळेवाडी, सोनवडे, शिंदेवाडी, हुंबरवाडी, चोपडी, बेलवडे, आंब्रूळे, कुसरूंड व सांगवड या गावांना तसेच या गावांमधील ग्राम समिती आणि शाळांना पथकाने भेट देऊन नवीन संस्थात्मक विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

फोटो : ३० केआरडी ०३

कॅप्शन : पाटण तालुक्यात संस्थात्मक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले असून, या कक्षांना पथकाकडून भेट दिली जात आहे.

Web Title: The administration pushed for institutional separation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.