पूरबाधितांसाठी धावले प्रशासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:39 AM2021-07-29T04:39:15+5:302021-07-29T04:39:15+5:30
सातारा : पूरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित ५ हजार ७०३ कुटुंबांतील २६ हजार १२८ व्यक्तींना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्य व केरोसीनचे ...
सातारा : पूरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित ५ हजार ७०३ कुटुंबांतील २६ हजार १२८ व्यक्तींना जिल्हा प्रशासनामार्फत अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.
पूरबाधितांमध्ये वाई तालुक्यातील २९० कुटुंबांची संख्या असून १ हजार ५०३ व्यक्तींची संख्या आहे. कऱ्हाड तालुक्यातील १ हजार ४११ कुटुंबांतील ६ हजार १५५, पाटण तालुक्यातील २ हजार ४२५ कुटुंबांतील १० हजार ३०७, महाबळेश्वर तालुक्यातील ७३ कुटुंबांतील २६०, जावली तालुक्यातील १ हजार ७५० कुटुंबांतील ७ हजार ६९१ व सातारा तालुक्यातील ४४ कुटुंबांतील २१२ व्यक्ती अशा एकूण ५ हजार ७०३ कुटुंबांतील २६ हजार १२८ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाकडून अन्नधान्य व केरोसीनचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
स्वस्तधान्य दुकानदारांना सक्त सूचना पूरबाधित, अतिवृष्टीमुळे भूस्खलनबाधित कुटुंबांना शासन आदेशाप्रमाणे मंजूर केलेले धान्यवाटप करताना कोणत्याही पात्र लाभार्थ्याला डावलले जाऊ नये, यासाठी अत्यंत जबाबदारपणे वाटप करावे. तसेच या कामी तहसीलदार यांनी लक्ष ठेवावे, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.
नेत्यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप
कऱ्हाड तालुक्यात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, पाटण तालुक्यात गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई, जावली तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व महाबळेश्वर तालुक्यात आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
फाेटो ओळ : कऱ्हाड तालुक्यामध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पूरग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले.