प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्तांना मदत द्यावी : सत्यजितसिंह पाटणकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:27 AM2021-06-18T04:27:17+5:302021-06-18T04:27:17+5:30

रामापूर : पाटण तालुक्यात ढगफुटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगरभागातील गावांमधील अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. अनेक ...

Administration should immediately help the victims: Satyajit Singh Patankar | प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्तांना मदत द्यावी : सत्यजितसिंह पाटणकर

प्रशासनाने तत्काळ नुकसानग्रस्तांना मदत द्यावी : सत्यजितसिंह पाटणकर

Next

रामापूर : पाटण तालुक्यात ढगफुटीमुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. डोंगरभागातील गावांमधील अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. अनेक ओढ्यांवरील फरशी पूल वाहून गेल्याने, रस्त्यावर वृक्ष पडल्याने वाहतूक कोलमडली आहे. अतिवृष्टीमुळे पाटण शहरासह अनेक गावांतील घरांची पडझड झाली आहे. प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली आहे.

प्रसिद्धी पत्रकात पाटणकर यांनी म्हटले आहे की, ढगफुटीमुळे पाटण शहरासह ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबवणे, घाणव, तारळे, चाफळ या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे ओढ्यांच्या पाण्याचे प्रवाह बदलून ते पाणी शेतात घुसले आहे. त्यामुळे नुकतेच पेरणी केलेली पूर्ण पिके वाहून गेली आहेत. अगोदरच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या पावसामुळे पिके वाहून गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पेरणीसाठी त्वरित मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

या शेतकऱ्यांना मदत देण्यात विलंब झाला तर पेरणीचा कालावधी निघून जाईल, प्रशासनाने याची नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अनेक ओढ्यांवरील साकव, फरशी पूल वाहून गेल्याने, रस्त्यावर वृक्ष पडल्याने, दरी कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी व वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी. पावसाळा नुकताच सुरू झाला आहे.

पाटणकर यांच्या सूचनेनुसार, पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार व गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

Web Title: Administration should immediately help the victims: Satyajit Singh Patankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.