प्रशासनाने वारकऱ्यांच्या उद्रेकाची वाट पाहू नये : अक्षय महाराज भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:58 AM2021-02-23T04:58:08+5:302021-02-23T04:58:08+5:30
दहिवडी : आषाढी, कार्तिकी वारीदरम्यान वारकरी संप्रदायाने समन्वयाची भूमिका घेऊन शासन निर्णयाचे स्वागतच केले; पण माघ वारीदरम्यान प्रशासनाने पंढरी ...
दहिवडी : आषाढी, कार्तिकी वारीदरम्यान वारकरी संप्रदायाने समन्वयाची भूमिका घेऊन शासन निर्णयाचे स्वागतच केले; पण माघ वारीदरम्यान प्रशासनाने पंढरी क्षेत्रात मठात जाऊन जी धरपकड सुरू केली आहे. प्रशासनाचे हे कृत्य अतिशय संतापजनक असून प्रशासनाने वारकरी संप्रदायाच्या उद्रेकाची वाट पाहू नये, असा इशारा वारकरी संप्रदाय युवा मंचचे महाराष्ट्र अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी केले.
बिजवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अक्षय महाराज भोसले म्हणाले, ‘दरवर्षी माघ वारीला लाखो भाविक पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनाला येतात. मात्र, कोरोनाचे संकट पाहता दक्षता घेण्याची आवश्यकता आहे, हे आम्हालाही मान्य आहे; पण शासनाला नियमांची अंमलबजावणी करायची असेल तर त्या नियमांची स्वतः जाणीव करून घ्यावी व नियम पाळण्याची सुरुवात स्वतःपासून करावी. संतांजवळ मर्यादेने वागले पाहिजे, याची शिकवण प्रशासनास देण्याची आवश्यकता आहे. जे वारकरी बांधव अत्यंतिक निष्ठेने आपला आचारधर्म, संप्रदाय नियमावली सांभाळत आहेत ते तो मोडला जाऊ नये म्हणून पंढरीक्षेत्रात वास करीत आहेत. कोरोनाची एवढी भीती आहे तर वारीआधी दोन महिने ती काळजी घेणे गरजेचे होते. प्रत्येक मठात जाऊन वारकऱ्यांना पंढरीबाहेर काढत आहेत, ही गोष्ट लाजीरवाणी आहे.’