कोरोनानंतर अंत्यसंस्काराचा खर्च प्रशासनाने करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:44 AM2021-05-25T04:44:01+5:302021-05-25T04:44:01+5:30
वाई : राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च स्वतः करीत असून, वाई नगरपालिका मात्र अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या ...
वाई : राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती कोरोनाने मृत्यू पावलेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराचा खर्च स्वतः करीत असून, वाई नगरपालिका मात्र अंत्यसंस्कारासाठी मृतांच्या कुटुंबीयांकडे खर्चाची मागणी करीत आहे, ही बाब दुर्दैवाची आहे. अंत्यविधीचा खर्च घेणे पालिका प्रशासनाने बंद करावे अन्यथा वाई तालुका शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा मुख्याधिकाऱ्यांना शिवसेनेच्यावतीने देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनामुळे नागरिकांचे प्रचंड हाल चालले असताना अनेक कुटुंबांवर कोरोनाचे संकट ओढवले आहे. राज्यातील बहुतांश नगरपालिका कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांवर मोफत अंत्यसंस्कार करीत आहेत. वाई नगरपालिका प्रशासन मात्र याला अपवाद असून वाई शहरात कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी चक्क ७ हजार २०० रुपये शुल्क आकारात आहे. शुल्क जोपर्यंत भरण्यात येत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करण्यात येत नाही, ही बाब अतिशय संतापजनक आहे. वाई पालिकेच्या या व्यवहाराबाबत वाईकर नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
गेली दोन वर्षे वाई नगरपालिका कोरोनाचे संकट उभे असताना कोणत्याही करांमध्ये नागरिकांना सवलत देत नाही. असे असताना पालिका प्रशासन अंत्यसंस्काराच्या शुल्काबाबत उदासीन का? असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पालिकेने त्वरित निर्णय मागे घेऊन वाईकर नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल, असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख अनिल शेंडे, उपतालुका प्रमुख विवेक भोसले, शहर प्रमुख गणेश जाधव, योगेश चंद्रस, किरण खामकर, नितीन पानसे, संतोष पोफळे, सुरेश चव्हाण, संदीप साळुंखे, पंकज शिंदे, अभिषेक पानसे इत्यादींच्या सह्या आहेत.