प्रशासनाची कारवाईत ढील; चायना मांजाचा गळ्याला पीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:33+5:302021-01-04T04:31:33+5:30
सातारा : चायनीज मांजाला बंदी असतानाही साताऱ्यातील अनेक पतंग विक्रेत्यांकडून चायनीज मांजाची चोरी-छुपे विक्री केली जात आहे. लॉकडाऊनपूर्वी व ...
सातारा : चायनीज मांजाला बंदी असतानाही साताऱ्यातील अनेक पतंग विक्रेत्यांकडून चायनीज मांजाची चोरी-छुपे विक्री केली जात आहे. लॉकडाऊनपूर्वी व त्यानंतर शहरात एकही कारवाई न झाल्याने ‘बंदीतही चायनीज मांजाची चांदी’ सुरू असल्याचे चित्र साताऱ्यात दिसून येत आहे.
काचेची पूड लावलेल्या चायना मांजावर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बंदी घातली आहे. या मांजामुळे आतापर्यंत मनुष्यासह प्राणी आणि पक्ष्यांचेही जीव गेले आहेत. सातारा शहरासह जिल्ह्यात आजवर अनेक पक्षी मांजात अडकून मृत्युमुखी पडले आहेत, तर अनेक जायबंदी झाले आहेत. पशु-पक्ष्यांसोबत रस्त्यावरही अनेक अपघात घडले आहेत. मांजामुळे कोणाच्या गळ्याला काच पडतो, तर कोणाचे हात व बोट कापले जाते. त्यामुळे या मांजावर बंदी घालून याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम जिल्हा पोलीस दलाकडून हाती घेण्यात आली. मात्र, गेल्या दोन वर्षापासून कारवाईत ढील दिल्याने चायनीज मांजाची विक्री पुन्हा एकदा जोमाने सुरू झाली आहे.
मकरसंक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवसांत अबाल-वृद्धांकडून पतंग स्पर्धेचे आयोजन केले जाते. एकमेकांचा पतंग कापण्यासाठी पैजाही लावल्या जातात. यासाठी चायनीज मांजाचाच सर्रास वापर केला जातो. शहरासह जिल्ह्यात पतंगांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री सुरू झाली आहे. अनेक व्यावसायिक व दुकानदारांनी मांजाचा मोठा साठा करून ठेवला आहे. हा मांजा चोरी-छुपे विकला जात असून, प्रशासनाला याची गंधवार्ताही नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
(चौकट)
पक्ष्यांवरच येतेय ‘संक्रांत’
नायलॉन मांजामुळे जिल्ह्यात आजवर अनेक मुक्या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक घटना या कऱ्हाड तालुक्यात झाल्या असून, गेल्या वर्षांत सुमारे दहा पक्षी मांजात अडकून मृत्युमुखी पडले आहेत. काही पर्यावरणप्रेमींमुळे जखमी पक्ष्यांना जीवदानही मिळाले आहे. संक्रांतीच्या कालावधित अशा घटनांत वाढ होत आहे.
(चौकट)
प्रशासनाकडून दोन वर्षांत एकही ठोस कारवाई नाही
मांजाची विक्री सर्रासपणे केली जात असताना पोलीस दलासह पालिका प्रशासनाकडून अद्याप एकाही विक्रेत्यावर ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. मांजाची विक्री छोरी-छुपे केली जात असल्याने नक्की कारवाई कोणावर करायची? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारवाईच होत नसल्याने मांजा विक्रेते देखील निर्धास्त झाले आहेत. पोलिसांनी पथके तयार करून चायनीज मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
(कोट)
नायलॉन मांजामुळे या पक्ष्यांचा हकनाक बळी जात आहे. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मांजावर बंदी घालून त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही.
- जितेंद्र पाटोळे, पक्षीमित्र
(पॉइंटर)
२३ - मांजामुळे गेल्यावर्षी झालेले अपघात
३८ - मांजामुळे जखमी पक्षी
३२ - मांजामुळे जखमी व्यक्ती