कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रशासन उतरले रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:03+5:302021-04-02T04:42:03+5:30
कोरेगाव : कोरेगाव शहर व तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून, गुरुवारी सायंकाळी महसूल, ...
कोरेगाव : कोरेगाव शहर व तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या
कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला असून,
गुरुवारी सायंकाळी महसूल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाने संयुक्त कारवाई
केली. शासनाचे नियम तोडणाऱ्या १० दुकानांसह एका कोचिंग क्लासला सील
करण्यात आले. प्रशासनाने धडाकेबाज कारवाईला सुरुवात केल्याने व्यापारी व
व्यावसायिकांचे धाबे अक्षरश: दणाणले आहेत.
शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, शासनाच्या
नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापारी व व्यावसायिकांमुळे परिस्थिती
हाताबाहेर चालली होती. गुरुवारी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयात प्रांत
ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोरोना आढावा बैठकीत सर्वच
खातेप्रमुखांची कानउघाडणी करण्यात आली. प्रशासन कठोर कारवाई करत नसल्याने
बाजारपेठेत गर्दी ओसंडून वाहत होती.
बैठकीनंतर प्रांत ज्योती पाटील, मुख्याधिकारी विजया घाडगे, निवासी नायब
तहसीलदार सुयोग बेंद्रे, विठ्ठल काळे, पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे,
उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जुन्या मोटारस्टॅण्डपासून आझाद चौक आणि सुभाषनगर परिसरात नियमांचे उल्लंघन
करणाऱ्या १० दुकाने आणि एका कोचिंग क्लासवर कारवाई करण्यात आली. एक दिवसासाठी दुकाने व कोचिंग क्लास सील करण्यात आले.
चौकट :
प्रशासन ॲक्शन मोडवर...
कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने कठोर नियम केले आहेत, त्याचे सर्वांनी पालन
केलेच पाहिजे. कोरोनाविरुद्धची लढाई सर्वांचीच आहे. त्यामुळे आता
प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, गुरुवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात
आली आहे. महसूल, पोलीस आणि नगरपंचायत प्रशासनाची संयुक्त मोहीम यापुढेच सुरूच राहणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी पत्रकारांशी
बोलताना दिली.
०१कोरेगाव
फाेटो ओळ : कोरोनाविषयक नियम मोडणाऱ्या दुकानांना सील करताना ज्योती पाटील, विजया घाडगे, सुयोग बेंद्रे, विठ्ठल काळे, प्रभाकर मोरे, विशाल कदम व कर्मचारी.