पशुसंवर्धनमार्फत तीन कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:50+5:302021-06-24T04:26:50+5:30
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नवीन पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम, संरक्षक भिंत व इतर दुरुस्त्यांसाठी २ कोटी ...
सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत नवीन पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकाम, संरक्षक भिंत व इतर दुरुस्त्यांसाठी २ कोटी ९७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या निधीतून चांगल्या दर्जाची कामे होण्यासाठी सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मंगेश धुमाळ यांनी दिली.
याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात सभापती मंगेश धुमाळ यांनी म्हटले आहे की, ‘मागील सव्वा वर्षाहून अधिक काळ जिल्हा कोरोना संकटाचा सामना करत आहे. या संकटामुळे अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत. शेतकरी वर्गापुढेही अडचणी वाढल्या. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्यावतीने अनेक योजना प्रभावीपणे राबवून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम केले आहे. या संकटातही आवश्यक विकासकामे मार्गी लागली पाहिजेत, यासाठी प्रयत्न केला आहे.
पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात अनेक विकासकामे मार्गी लागत असून २ कोटी ९७ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून खंडाळा, खटाव, कोरेगाव, फलटण, जावळी, सातारा, वाई आदी तालुक्यात विविध प्रकारची कामे होणार आहेत. या कामांमुळे शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी जलद सुविधा मिळण्यास मदत होणार आहे, असेही सभापती धुमाळ यांनी स्पष्ट केले.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\\