साताऱ्यात होणार उत्पादन शुल्क विभागाची प्रशासकीय इमारत
By नितीन काळेल | Published: October 26, 2023 08:38 PM2023-10-26T20:38:48+5:302023-10-26T20:39:11+5:30
पालकमंत्र्यांचे प्रयत्न : सर्व सुविधांयुक्त; साडे चाैदा कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता
नितीन काळेल
सातारा : राज्य उत्पादन शुल्कच्या सातारा येथील अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय आणि विश्रामगृह इमारतीच्या साडे चाैदा कोटी रुपये खर्चाच्या बांधकामास गुरुवारी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून लवकरच सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारत साताऱ्यातील गोडोलीत उभी राहणार आहे.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राज्य उत्पादन शुल्कचा कार्यभार हाती घेतल्यापासून विभागाच्या कामात सुसूत्रता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. तर सातारा येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीची मान्यता प्रलंबित होती. मात्र, मंत्री देसाई यांच्या प्रयत्नातून या कामास गृह विभागाकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.
सातारा शहरातील गोडोली येथील एकूण ०.४६ हेक्टर क्षेत्रावरील विभागाच्या मालकीच्या जागेवर अधीक्षक कार्यालयाची इमारत तसेच विश्रामगृह इमारत बांधण्यात येणार आहे. या बांधकामासाठी १४ कोटी ५० लाख ८० हजार रुपये खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यामुळे लवकरच सर्व सुविधांयुक्त प्रशासकीय इमारत उभी राहणार आहे.
उत्पादन शुल्क विभाग शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा शासकीय विभाग आहे. गेल्या आर्थिक वर्षात विभागाने विक्रमी महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. उत्पादन शुल्कला चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास विभागाची कार्यक्षमता आणखी वाढेल, असा विश्वास आहे. त्याच भूमिकेतून सातारा येथे अधीक्षक कार्यालय आणि विश्रामगृहाच्या इमारतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सर्व सुविधायुक्त प्रशासकीय इमारत होईल, याचा आनंद आहे.
- शंभूराज देसाई, पालकमंत्री