राजकीय परिणामांचा विचार न करता बाधितांना विलगीकरण कक्षात दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:37 AM2021-05-26T04:37:57+5:302021-05-26T04:37:57+5:30

तरडगाव : ‘गृह विलगीकरणात असणारे कोरोनाबाधित योग्य काळजी घेत नसल्याने त्यातून आजूबाजूला बाधित रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अशा रुग्णांना ...

Admit victims to the isolation room without considering the political consequences | राजकीय परिणामांचा विचार न करता बाधितांना विलगीकरण कक्षात दाखल करा

राजकीय परिणामांचा विचार न करता बाधितांना विलगीकरण कक्षात दाखल करा

googlenewsNext

तरडगाव : ‘गृह विलगीकरणात असणारे कोरोनाबाधित योग्य काळजी घेत नसल्याने त्यातून आजूबाजूला बाधित रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे अशा रुग्णांना घरी थांबू न देता कार्यकर्त्यांनी भले वाईटपणा स्वीकारून त्यांना वेळीच इतर मोठ्या विलगीकरण कक्षात दाखल करावे,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे.

फलटण तालुक्यातील तरडगाव येथील चांदोबाचा लिंबजवळील हिंदवी पॅलेसमध्ये उभारण्यात आलेल्या १०१ बेडच्या कोरोना विलगीकरण कक्षाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते या कक्षाचे उद्‌घाटन झाले. यावेळी आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते.

रामराजे म्हणाले, ‘ग्रामीण भागात सध्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. यासाठी तालुका पातळीवर संजीवराजे हे तलाठी, ग्रामसेवक आदी पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन बैठका घेत आहेत, तरी लोक ऐकत नाहीत. ही मोठी वाईट परिस्थती आहे. आम्ही औषध व ऑक्सिजन आणतोय. बंद पडलेली कंपनी सुरू केली. ऑक्सिजन प्लांट दिले आहेत. कार्यकर्त्यांनो, वाईटपणा आला तरी आपले काम सुरू ठेवा. शासन हे आपल्यापरीने काम करीत आहे. अनेक ठिकाणी मोठी विलगीकरण कक्ष आहेत. काही गावांतील शाळांमध्ये असे कक्ष तयार केले आहेत. तरी रुग्ण दाखल होतच नाहीत. तालुक्याच्या भल्यासाठी कटुता आली तरी येऊ द्या, राजकीय परिणामांची वेळ आली तरी येऊ द्या, मात्र तालुक्याचा विचार हा आपल्यालाच करावा लागणार आहे.’

यावेळी पंचायत समितीचे सभापती शिवरूपराजे खर्डेकर, उपसभापती रेखा खरात, माजी सभापती वसंतराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य दत्ता अनपट, पंचायत समिती सदस्य विमल गायकवाड, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, गट विकास अधिकारी डॉ. अमिता गावडे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम, सरपंच जयश्री चव्हाण उपस्थित होते.

चौकट

दहा गावांचा लोकसहभाग

कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांना मुबलक सुविधा पुरविण्यासाठी परिसरातील दहा गावांनी लोकसहभागातून पुढाकार घेतला आहे. कक्षात दोन वेळच्या जेवणाची व नास्त्याची सोय केली गेली आहे. विविध ग्रामपंचायतींनी बाधितांसाठी बेड उपलब्ध केले आहेत. ग्रामसेवक संघटनेने उशा व गाद्या दिल्या आहेत. पहिल्या दिवशी कक्षात नऊ रुग्ण दाखल झाले आहेत.

फोटो २५तरडगाव-रामराजे

फलटण तालुक्यातील चांदोबाचा लिंब, तरडगाव येथे १०१ बेडच्या कोरोना विलगीकरण कक्षाचे उद्घाटन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आदी. (छाया : सचिन गायकवाड)

Web Title: Admit victims to the isolation room without considering the political consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.