धावडवाडी गाव सभापतींकडून दत्तक
By Admin | Published: November 17, 2014 10:09 PM2014-11-17T22:09:09+5:302014-11-17T23:25:08+5:30
गावात अभियान राबविताना कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही. पदाधिकाऱ्यांचे सहकार्य
खंडाळा : ‘स्वच्छता मोहिमेमुळे गावाचे आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक स्वच्छतेबरोबच वैयक्तिक शौचालये बांधण्याचे उद्दिष्ठ शंभर टक्के पूर्ण करावे. केवळ दिखाव्यासाठी स्वच्छता न करता ती सातत्याने राखली पाहिजे. त्यासाठी गावपातळीवर प्रत्येकाने सामाजिक भूमिकेतून काम करावे,’ असे मत सभापती रमेश धायगुडे-पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, त्यांनी धावडवाडी हे गाव दत्तक घेतले आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या प्रारंभाची आढावा बैठक खंडाळा येथे किसन वीर सभागृहात घेण्यात आली. यावेळी प्रांताधिकारी रवींद्र खेबुडकर, तहसीलदार शिवाजी तळपे, उपसभापती सारिका माने, जिल्हा परिषद सदस्या स्वाती बरदाडे, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध गाढवे, दीपाली साळुंखे, अनिता शेळके, गटविकास अधिकारी विालस साबळे, गटशिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, बालविकास अधिकारी एस. एम. सोनावणे उपस्थित होते.
‘स्वच्छ भारत’ अभियान अंतर्गत गावपातळीवर नेमून दिलेल्या आराखड्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, शौचालयांसह गावचा परिसर, शालेय परिसर, गटार व्यवस्था, पाण्याच्या सुविधा, आरोग्य सुविधा याबाबतीत योग्य नियोजन करण्याचे ठरविण्यात आले. तालुका पातळीवरील प्रत्येक विभागाला स्वतंत्रपणे कामकाज दिले असून, सर्वांना दक्षपणे राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्रत्येक गावात अभियान राबविताना कोणतीही अडचण भासू दिली जाणार नाही. सर्व गावांसाठी पदाधिकाऱ्यांचे पूर्णत: सहकार्य राहील, असे सदस्य अनिरुद्ध गाढवे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
खंडाळा येथे स्वच्छ भारत अभियानाच्या बैठकीत स्वच्छेतेची शपथ घेताना रमेश धायगुडे-पाटील, रवींद्र खेबुडकर, शिवाजी तळपे, सारिका माने आदी.