जाहिरात तुमची.. जीव जातोय आमचा!
By admin | Published: June 26, 2015 11:22 PM2015-06-26T23:22:55+5:302015-06-27T00:15:42+5:30
होर्डिंगचं दुखणं : सार्वजनिक ठिकाणी घुटमळतोय मृत्यू
सागर गुजर - सातारा --राजवाडा बसस्थानकात लावलेले लोखंडी होर्डिंग कोसळल्याने युवती गंभीरीत्या जखमी झाली. यानंतर गर्दीच्या ठिकाणी लावलेल्या होर्डिंगचा प्रश्न आ वासून समोर आला आहे. होर्डिंग लावलेल्या ठिकाणी उभे राहण्याचे धाडसच होत नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून यायला लागल्या आहेत.
गजबजलेल्या ठिकाणी अजस्त्र जाहिरातींचे होर्डिंग लागलेले पाहायला मिळतात. विशेषत: बसस्थानके, गर्दीचे चौक, मुख्य रस्ते यासाठी निवडले जातात. या होर्डिंगसाठी लोखंडी अँगल, गज यांचा वापर केला जातो. या होर्डिंग्जवर चमकदार जाहिराती झळकत असल्या तरी त्या ज्यावर उभ्या आहेत, त्यांचे गज व अँगल गंजलेले असतात. त्याचे फाउंडेशनही दर्जेदार पद्धतीने केलेले नसते. खाली उभ्या नागरिकांची, व्यावसायिका, वाहनधारकांची सुरक्षा रामभरोसे असते.
वादळी वाऱ्यामुळे अशा प्रकारच्या होर्डिंग्जना धोका असतो. पुणे-बंगलोर महामार्गावरही काही दिवसांपूर्वी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे असे होर्डिंग्ज भुईसपाट झाले होते. यात व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले; पण तरीही पुन्हा असे होर्डिंग्ज पुन्हा उभे राहिले.
मुख्य प्रश्न असतो तो लोकांच्या सुरक्षेचा गर्दीच्या ठिकाणी व्यवसायाची जाहिरात होते. त्यामुळे आपोआप उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळते; मात्र ही जाहिरात पाहणारे ती उत्पादने खरेदी करण्यासाठी जिवंत तरी राहिले पाहिजेत. याचा विचार करून होर्डिंग्ज व्यावसायिकांनी असे फलक उभे करावेत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या आपल्या सग्या-सोयऱ्यांच्या सुरक्षेच्या काळजीने घरच्यांची गाळण उडते आहे, याचा तरी विचार करावा, मृत्यू कुठल्याही वाटेने येऊन प्रत्येकाला गाठणार आहे, तो चुकणार नाही, हे जरी सत्य असले तरी कृत्रिम बाबींपासून सुरक्षित राहता येऊ शकते. दुर्लक्ष केले तर हा मृत्यू तुमच्या-आमच्या जवळच घुटमळतो आहे.
दरम्यान, असुरक्षित होर्डिंगचा फायदा संबंधित जागा मालकांना मिळतो; पण त्यापासून कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जागा मालकाची असते. जाहिरात उभी करण्याबाबत केलेल्या करारात ही जबाबदारी जागा मालक संबंधित जाहिरात फलक उभे करणाऱ्यांवर टाकतात. गुरुवारच्याच घटनेत कारवाई करण्याच्या संदर्भाने हालचाली तत्काळ झाल्या नाहीत. एस.टी.च्या जागेत असणारे होर्डिंग्ज पडला. त्यात मुलगी जखमी झाली. पण घटनेमागची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही, असे दिसते. याप्रकरणी आणखी काही दिवस चर्चा होईलही पण कायमची उपाययोजना करण्याची गरज आहे.
एस.टी., एलआयसीची कर चुकवेगिरी
एस. टी. व एलआयसी या दोन महामंडळांचे जाहिरात कर पालिकेकडे जमा होत नाहीत. स्वत:च्या जागेत होर्डिंग आहेत, मग त्याचा कर पालिकेला का भरायचा?, असा त्यांचा दावा आहे. मात्र, पालिकेच्या म्हणण्यानुसार खासगी जागेवर जरी जाहिरात फलक उभा करायचा झाल्यास त्याचा जाहिरात कर पालिकेत जमा करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयात येण्यासाठी आम्हाला एस.टी. बस स्थानकावर थांबावेच लागते. त्याला पर्याय काय? पण, आता होर्डिंगच्या खाली उभे राहणे धोकादायक वाटते. काही दिवसांपूर्वी एस.टी. बसस्थानकातील स्लॅब कोसळला होता. त्यामुळे आता कुठेही असुरक्षित वाटत राहते.
- अनिकेत जोशी,
सातारा
गजबजलेल्या ठिकाणी होर्डिंग्ज लावणे अपरिहार्य असले तरी लोकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. ज्या ठिकाणी असे होर्डिंग्ज आहेत, त्या ठिकाणी सुरक्षा घेतली जावी. लोकांचा जीव इतका स्वस्त नाही की, तो सहज जावा. त्यामुळे ज्यांच्या जागेत अशी होर्डिंग्ज आहेत, त्यांनी लोखंडी अँगल गंजलेले आहेत का? याची तपासणी करावी.
- तेजस शिर्के, सातारा