जावलीतील बाधित गावांचे पुनर्वसन व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:47 AM2021-09-08T04:47:27+5:302021-09-08T04:47:27+5:30
कुडाळ : जुलै महिन्यात जावली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर भागातील शेती, विहिरी व पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. येथील ...
कुडाळ : जुलै महिन्यात जावली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळघर भागातील शेती, विहिरी व पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. येथील शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी व बाधित गावांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जावलीचे माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, २२ व २३ जुलैला जावलीतील केळघर भागात ढगफुटी होऊन सहाशे मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला. याचा वेण्णा नदीच्या काठावर असणाऱ्या बोंडारवाडी, भुतेघर, बाहुळे, वाळंजवाडी, तळोशी तर वाहिटे, मुकवली, वाटंबे, वरोशी, केडंबे, पुनवडी, केळघर, नांदगणे, आंबेघर, डांगरेघर, भामघर, गवडी, करंजे, आसणी भामघर सावली म्हाते कुरळोशी, गाढवली, ओखवडी, भोगवली आदी गावांना फटका बसला आहे.
दरवर्षी पावसाळ्यात येथील डोंगरमाथ्यावरील जमिनी खचत आहेत. ही बाब लक्षात घेऊन या गावांचे नजिकच्या वनविभागातील जमिनीवर कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, जमिनीची दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन मंडळामार्फत ‘खास बाब’ म्हणून विशेष योजना राबवावी, शेती तयार करण्यासाठी मशिनरी व इंधन पुरवठा व्हावा, बोंडारवाडी ते करंजे गावापर्यंत वेण्णा नदीचे दोन्ही काठ मजबूत करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.