गावकऱ्यांची भटकंती थांबणार- कासला १३३ वर्षांनंतर ‘कास’चं पाणी ! सातारा पालिकेत ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:32 AM2019-07-24T00:32:03+5:302019-07-24T00:34:31+5:30
कास तलाव ब्रिटिशकालीन असला तरी त्याची उभारणी नगरपालिकेच्या माध्यमातून १८८६ मध्ये करण्यात आली. या तलावातून बिडाचे नळ टाकून विशिष्ट उंचीवरून पाणी खाली पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली.
सचिन काकडे ।
सातारा : कास तलावाच्या उभारणीसाठी ज्यांनी आपली घरे सोडली, जमिनींचा त्याग केला ते कास गाव आजही तलावाच्या पाण्यापासून वंचित आहे. गावकऱ्यांची १३३ वर्षांपासून पाण्यासाठी सुरू असलेली ही भटकंती आता थांबणार असून, गावाला हक्काचं पाणी मिळणार आहे. पाणी उपसा करण्यासाठी महावितरण विभागाच्या वतीने तलावाजवळ थ्री फेज कनेक्शन जोडले जाणार आहे. पालिकेकडून या कामाचा ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
कास तलाव ब्रिटिशकालीन असला तरी त्याची उभारणी नगरपालिकेच्या माध्यमातून १८८६ मध्ये करण्यात आली. या तलावातून बिडाचे नळ टाकून विशिष्ट उंचीवरून पाणी खाली पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली. ज्यावेळी कास तलाव बांधण्यात आला, त्यावेळी त्याच्या उभारणीत अडथळा ठरणाºया कास गावाचे पर्यायी जागेत पुर्नवसन करण्यात आले. मात्र या गावाला अजूनही गावठाण मंजूर झाले नाही.
कास हे गाव जावळी तालुक्यात येत असले तरी या गावाने सातारकरांची तहान भागावी, यासाठी आपली घरे व जमिनींचा त्याग केला; परंतु १३३ वर्षे झाली तरी या गावाच्या नशिबी केवळ संघर्षच आला आहे. हक्काचं पाणी मिळावं, यासाठी ग्रामस्थांकडून शासन व लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याला आता यश आले आहे. थ्री फेज कनेक्शन जोडून तलावातून पाणीउपसा करण्यास नगरपालिकेडून मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी सात ते आठ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महावितरण विभागाने कास परिसराची पाहणी केली असून, निधी वर्ग होताच या कामास प्रारंभ केला जाणार आहे.
डोंगरकपारीतील झरे भागवितायत तहान
कास गावची लोकसंख्या हजाराच्या घरात आहे. डोंगरकपारीतून वाहणारे झरे गेल्या अनेक वर्षांपासून येथील गावकºयांची तहान भागवत आहेत. हे झरे उन्हाळ्यात आटल्यानंतर ग्रामस्थांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कास तलावातून पाणी आणण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय ग्रामस्थांपुढे नसतो. ही भटकंती आता पूर्णपणे थांबणार आहे.
कास ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासून पाणी अन् गावठाणासाठी संघर्ष सुरू आहे. थ्री फेज कनेक्शन जोडण्याचा ठराव नगरपालिकेत मंजूर करण्यात आला असला तरी हे काम तातडीने मार्गी लावून गावकºयांना हक्काचं पाणी उपलब्ध करून द्यावं. कास गावाने आतापर्यंत केवळ त्यागच केला आहे. कास तलावाची उंची वाढविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी रोजगार निर्मिती उपलब्ध करून द्यावी. तसेच स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात यावे.
-विष्णू कीर्दत, ग्रामस्थ, कास
सातारा शहरातील लाखो लोकांची तहान भागावी, यासाठी कास ग्रामस्थांनी आपल्या जमिनी दिल्या. मात्र, आमच्याच गावाला हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावं लागलं. डोंगरातील झरे आजही आमची तहान भागवत आहेत. मात्र, उन्हाळ्यात टंचाईचा सामना करावा लागतो. सलग दोन महिने ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. प्रामुख्याने महिला व वृद्धांचे मोठे हाल होतात. ही भटकंती आता थांबायलाच हवी.
- दत्ताराम कीर्दत, ग्रामस्थ कास