Satara: दमदार सुरुवातीनंतर पाऊस थांबला; खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 12:58 PM2024-06-18T12:58:36+5:302024-06-18T12:59:57+5:30

पावसाने जूनमधील उच्चांकही मोडला, कोयनेला एक मिलिमीटरची नोंद

After a strong start the rain stopped; Koynela records one millimeter, sowing of kharif season will speed up | Satara: दमदार सुरुवातीनंतर पाऊस थांबला; खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार

Satara: दमदार सुरुवातीनंतर पाऊस थांबला; खरीप हंगामातील पेरणीला वेग येणार

सातारा : जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानंतर आठवडाभर दमदार पाऊस झाला; पण दोन दिवसांपासून पावसाची उघडीप आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर आणि महाबळेश्वर येथे एक तर नवजाला फक्त दोन मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. तर पावसाच्या उघडिपीमुळे खरीप हंगाम पेरणीला वेग येणार आहे.

जिल्ह्यात मागील चार वर्षांत मान्सूनचा पाऊस १० जूननंतरच दाखल झाला; पण यंदा मान्सूनची सुरुवात लवकर झाली. ६ जूनपासूनच जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. पश्चिम भागात नेहमीच दमदार हजेरी लावणारा पाऊस पूर्वेकडेही झाला. त्यामुळे पावसाने सर्वांनाच सुखावून सोडले आहे. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात सुरुवातीला धुवाधार पाऊस पडला. यामुळे ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे. तसेच भात खाचरातही पाणी साचले आहे. सध्या भात लागणीची गडबड सुरू झाली आहे. 

तर पूर्व दुष्काळी भागात यंदा जूनमध्येच सलग आठ दिवस पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाने जूनमधील उच्चांकही मोडला आहे. या पावसामुळे बहुतांशी गावच्या ओढ्यांना पाणी वाहिले. शेतजमिनीत पाणी साचले. त्यामुळे खरीप हंगामासाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.

सध्या काही ठिकाणी पेरणीही सुरू आहे. तर पावसामुळे बंधारे भरले आहेत. तसेच विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ झालेली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना पाणी कमी पडणार नाही.
मान्सून दाखल होऊन ११ दिवस होऊन गेले आहेत. सुरुवातीला दमदार पाऊस पडला असलातरी सध्या उघडीप आहे. त्यामुळे पेरणीला वेग येणार आहे; पण पावसाची ही दडी कायम राहिली तर शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण होणार आहे.

नवजाला ३१३ मिलिमीटर पर्जन्यमान..

जिल्ह्याच्या पश्चिम भागातही पावसाची उघडीप आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला फक्त एक मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर एक जूनपासून कोयनानगर येथे २६१ आणि नवजाला सर्वाधिक ३१३ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला आतापर्यंत २३८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात अजून पाण्याची आवक सुरू नाही. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात १४.८७ टीएमसी पाणीसाठा होता. टक्केवारीत हे प्रमाण १४.१३ इतके आहे. तर जिल्ह्याच्या इतर धरणक्षेत्रातही पावसाची उघडीप आहे.

Web Title: After a strong start the rain stopped; Koynela records one millimeter, sowing of kharif season will speed up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.