अखेर ‘आदर्श’ वाटचाल सुरू!
By admin | Published: September 22, 2015 08:27 PM2015-09-22T20:27:03+5:302015-09-22T23:52:39+5:30
चार आमदार सरसावले : शिंदेंनंतर रामराजे, पृथ्वीराज, शंभूराज, आनंदरावांनी सादर केले प्रस्ताव--लोकमतचा प्रभाव
सागर गुजर -- सातारा राज्य शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेकडे पाठ फिरविलेल्या जिल्ह्यातील बहुतांश आमदारांनी ‘लोकमत’च्या वृत्तानंतर या योजनेकडे धाव घेतली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. शंभूराज देसाई, आ. आनंदराव पाटील यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन ई-मेल व फॅक्सद्वारे नियोजन विभागाला आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवडलेल्या प्रत्येकी चार गावांची यादी दिली आहे.
‘आदर्श ग्राम योजनेकडे बहुतांश आमदारांची पाठ’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने दि. १७ सप्टेंबर २0१५ च्या अंकात वृत्त प्रसिध्द केले होते. या तारखेआधी आमदार शशिकांत शिंदे यांनीच केवळ गावांचा प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर केला होता. ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिध्द होताच त्याच दिवशी आमदार शंभूराज देसाई यांनी आपला प्रस्ताव नियोजन विभागाकडे दिला. त्यामध्ये वेखंडवाडी, सोनवडे (ता. पाटण) व आरेवाडी (ता. कऱ्हाड) ही त्यांच्या मतदारसंघातील तीन गावे योजनेसाठी निवडली आहेत. आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. १८ सप्टेंबर रोजी भोगाव, गोळेश्वर, पोतले (ता. कऱ्हाड) या तीन गावांचा प्रस्ताव दिला. विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी त्याच दिवशी गावांचा प्रस्ताव दिला. त्यांनी फलटण तालुक्यातील दुधेबावी, खंडाळा तालुक्यातील अहिरे व कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ही गावे योजनेसाठी घेऊन ‘बॅलन्स’ साधण्याचा प्रयत्न केला आहे. आ. आनंदराव पाटील यांनी कऱ्हाड तालुक्यातील मुंढे, पाडळी (केसे), टाळगाव ही तीन गावे निवडून त्याचा प्रस्ताव दि. १९ सप्टेंबर रोजी दाखल केला आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांनीही प्रस्ताव सादर करण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.
महाराष्ट्रात ‘आमदार आदर्श ग्राम’ योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असला तरी या योजनेकडे जिल्ह्यातल्या आमदारांनी पाठ फिरविली होती. मे महिन्यात आदेश निघाल्यानंतर माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी आघाडी घेत तीन गावांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन विभागाकडे सर्वात आधी सादर केला होता. त्यांनी आपल्या मतदारसंघातील चिंचणेर निंब (ता. सातारा), कटगुण (ता. खटाव) व देऊर (ता. कोरेगाव) ही तीन गावे रचनात्मक विकासासाठी निवडली आहेत.
केंद्र सरकारच्या ‘सांसद आदर्श ग्राम’ योजनेच्या धर्तीवर राज्यात ‘आमदार आदर्श ग्राम’ योजना राबविण्याचा निर्णय राज्यातील फडणवीस सरकारने घेतला आहे. शासनाने याबाबत २0 मे २0१५ ला अद्यादेश काढला आहे. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराने गावे निवडण्याचे आवाहन केले होते. मात्र यानंतरही आमदारांचा थंडा प्रतिसाद होता. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द करताच आमदारांनी या योजनेतील सहभागासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या हालचाली सुरु केल्या.
शासनाच्या ‘आमदार आदर्श ग्राम’ योजनेबाबत जिल्ह्यातील बहुसंख्य आमदारमंडळी बॅकफूटवर आहेत. यामागची कारणमिमांसा शोधण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला असता संपूर्ण मतदारसंघातील तीन गावेच आदर्श करायची, तर मतदारसंघातील इतर गावांची नाराजी ओढवून घेण्याची शक्यता असते. तरीही टप्पाटप्प्याने गावे सुधारण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल. तसे एका गावाचा आदर्श घेऊन बाजूची गावे सुधारतील, असाही राज्य शासनाचा या योजनेमागचा कयास आहे.
योजनेत घेण्यासाठी गावकरी सरसावले!
आमदारांनी आपले गाव दत्तक घ्यावे, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक जण आमदारांची खासगीत भेट घेऊन त्यांच्याकडे गाव योजनेत घेण्याची विनंती करत आहेत. याउलट काही गावांचे असेही पदाधिकारी आहेत की त्यांना ही योजना काय रे भाऊ म्हणण्याची वेळ आली आहे.