रजिस्टर नोंदीवरून बाचाबाची, गाडीतून नेऊन रॉडने मारहाण; सातारा औद्योगिक वसाहतीतील प्रकार
By नितीन काळेल | Published: April 18, 2024 05:45 PM2024-04-18T17:45:28+5:302024-04-18T17:45:47+5:30
शहर पोलिसांत चाैघांवर गुन्हा नोंद
सातारा : ड्युटीवर असताना रजिस्टरवर नोंद घेण्याच्या कारणातून बाचाबाची झाल्यानंतर घरी जाताना एकाला गाडीतून नेऊन लाेखंडी राॅड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. हा प्रकार आैद्योगिक वसाहतीत घडला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चाैघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी दिनकर काशीनाथ चव्हाण (रा. शिवराज पेट्रोल पंप, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार सोमनाथ चाैगुले (पूर्ण नाव, पत्ता नाही) आणि अनोळखी तिघांजणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. हा प्रकार दि. १५ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नवीन आैद्योगिक वसाहतीत घडला. फिर्यादी चव्हाण हे ड्युटीवर असताना रजिस्टरवर नोंद घेण्याच्या कारणावरुन संशयितांबरोबर त्यांची बाचाबाची झाली.
याचा राग मनात धरुन फिर्यादी हे ड्युटी संपवून घरी जात होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना गाडीत घालून नेले. तसेच लोखंडी राॅड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. त्यानंतर अपघात झाला असल्याचा बनाव करण्यात आला. सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर दुखापतीचा गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक शिरोळे हे तपास करीत आहेत.