जनता बँकेतून मातब्बरांचे अर्ज बाद
By admin | Published: May 4, 2016 10:43 PM2016-05-04T22:43:54+5:302016-05-05T00:05:28+5:30
सांगा, जनता बँक कोणाची.. ?
सातारा : जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीत ७९ उमेदवारांपैकी २७ उमेदवारांचे अर्ज मंगळवारी झालेल्या छाननीत बाद ठरले. अर्ज बाद होणाऱ्यांमध्ये मातब्बर मंडळींचा समावेश आहे. उर्वरित ४५ उमेदवारांपैकी २९ जणांनी सत्ताधारी भागधारक पॅनेलकडे उमेदवारी मागितल्याचा दावा अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केला असून, विरोधकांकडे केवळ ११ ते १२ उमेदवार उरतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ७९ उमेदवारांनी १०९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी झालेल्या छाननीत २७ जणांचे उमेदवारी अर्ज बाद ठरले. सर्वसाधारण गटातील १९ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. महिला राखीवमधून ३, भटक्या जमातीतून २, इतर मागास प्रवर्गातून २, अनुसूचित जाती जमातीमधून १ असे एकूण २७ जणांचे अर्ज बाद ठरले आहेत.सर्वसाधारण गटातून किशोर शिंदे, प्रकाश बडेकर, वसंत लेवे, निशांत पाटील, नीलेश महाडिक, डॉ. अच्युत गोडबोले, नासीर शेख, रफीक बागवान, प्रशांत घोरपडे, प्रशांत आहेरराव, अविनाश कदम, सीताराम बाबर, वसंत जोशी, सतीश सूर्यवंशी, हेमचंद्र कासार, अमिन कच्छी, शिवराम वायफळकर, गणपतराव मोहिते, महेंद्र जाधव यांचे अर्ज बाद झाले. महिला राखीवमधून स्वाती आंबेकर, सुनीता घाडगे, सुनीता पाटणे यांचे अर्ज बाद झाले. विमुक्त जाती, भटक्या जमातीतून अशोक शेडगे, रामनाथ वायफळकर यांचे अर्ज बाद ठरले. इतर मागास प्रवर्गातून रफीक बागवान,
अविनाश कारंजकर यांचे अर्ज बाद झाले. अनुसूचित जाती जमातीतून अनिकेत तपासे यांचा अर्ज बाद झाला. (प्रतिनिधी)
उपनिबंधकांकडे अपील
निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत श्रीखंडे यांनी बँकेच्या पोटनियमानुसार २७ जणांचे अर्ज बाद ठरविले. निवडणुकीतून बाहेर पडावे लागणार असल्याने या उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधकांकडे अपील दाखल केले असून, येत्या दोन-तीन दिवसांत याचा निर्णय होईल, अशी माहिती प्रकाश गवळी यांनी दिली.
या निवडणुकीसाठी बँकेला किमान ५० लाखांचा खर्च येणार आहे. हा खर्च वाचावा ही आमची भूमिका आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मी व अॅड. मुकुंद सारडा कोणाशीही चर्चा करायला तयार आहे. अगदी प्रकाश गवळी हे चर्चेला तयार असतील तरीदेखील त्यांच्याशी आम्ही बोलणी करू.
- विनोद कुलकर्णी, अध्यक्ष,
जनता सहकारी बँक