बैलगाडी बंदी उठल्यानंतर पहिली शर्यत पुसेगावात !

By admin | Published: January 10, 2016 12:39 AM2016-01-10T00:39:41+5:302016-01-10T00:39:41+5:30

उद्या धावणार गाड्या : सेवागिरी यात्रेत शेतकऱ्यांच्या उत्साहाला उधाण

After the ceasefire ban, the first race in Pusgaon! | बैलगाडी बंदी उठल्यानंतर पहिली शर्यत पुसेगावात !

बैलगाडी बंदी उठल्यानंतर पहिली शर्यत पुसेगावात !

Next

पुसेगाव : गेल्या ६८ वर्षांपासून पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा भरविण्यात येते. मुळातच शेतकऱ्यांची यात्रा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या या यात्रेचे मुख्य आकर्षण बैलगाड्यांच्या शर्यती आहे. दरम्यानच्या काळात शर्यतींवर बंदी आली. ही बंदी उठल्यानंतर पहिली शर्यत सोमवारी पुसेगावला भरविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
दोन वर्षांपूर्वी बैलगाड्यांच्या शर्यतींवर शासनाने बंदी घातली होती; परंतु श्री सेवागिरी महाराजांची यात्रा तोंडावर आली असतानाच अचानक बंदी उठली आणि त्या यात्रेत भरलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीला मोठा प्रतिसाद मिळाला. शर्यती झाल्या आणि काही दिवसांनी पुन्हा शासनाने बंदी कायम केली. गेल्यावर्षीही शासनाची या शर्यतीवरील बंदी कायमच राहिली. शेवटपर्यंत बैलगाड्यांच्या शर्यती होतीलच या आशेवर बैलगाड्या शौकिनांच्या नजरा शासनाच्या निर्णयाकडे
लागल्या होत्या; मात्र पुसेगावच्या इतिहासात गतवर्षीची सेवागिरी यात्रा पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतीविनाच पार पडली.
लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे पुसेगावच्या बैलगाडी आखाड्याचे भवितव्य काय? बैलगाड्या धावणार की नाही, याबाबत चर्चा रंगली होती. दरम्यान, शासनाने बैलगाड्यांच्या शर्यतीला काही अटींवर परवानगी दिल्याने पुसेगावचा यावर्षी बैलगाड्यांचा शर्यंत निर्विघ्नपणे पार पाडण्याचा मार्ग खुला झाला. स्पर्धा सोमवार, दि. ११ रोजी सकाळी नऊला होणार आहेत.
शर्यतींचे उद्घाटन मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते व आमदार शशिकांत शिंदे, आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ट्रस्ट अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव उपस्थित राहणार आहेत.
पुसेगाव-बुध रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ होणाऱ्या या शर्यंतीसाठीच्या सर्व तांत्रिक व कायदेशीर बाबी देवस्थान ट्रस्टतर्फे पूर्ण केल्या आहेत. शासनाने घालून दिलेल्या शर्थी व नियमांचे पालन बैलगाडी मालकांनी करावे, असे आवाहन अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे. (वार्ताहर)

केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी कायमची उठवली तर खऱ्या अर्थाने जातिवंत खिलार जनावरांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल.
-विजय जाधव,
विश्वस्त, सेवागिरी देवस्थान

Web Title: After the ceasefire ban, the first race in Pusgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.