शंभरीनंतरही कृष्णा पूल हट्टाखट्टा !
By admin | Published: February 1, 2015 09:02 PM2015-02-01T21:02:24+5:302015-02-02T00:07:33+5:30
‘संगम माहुली’चा शतकवीर : दररोज हजारो वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्थितप्रज्ञासारखा उभा
जगदीश कोष्टी - सातारा -सातारा-कोरेगाव मार्गावरील माहुली येथे कृष्णानदीवर असलेला ब्रिटिशकालीन पूल जून महिन्यात शंभर वर्षे पूर्ण करत आहेत. या पुलाने शंभरी पूर्ण करूनही हा पूल दररोज हजारो वाहनांची वाहतूक करण्यासाठी स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. इंग्रजांनी देश सोडून ६६ वर्षे झाली; पण त्यांच्या असंख्य खाणाखुणा आजही आहेत. त्यातील काही आठवणी चांगल्या आहेत, तर काही वाईट आहेत. त्यातील एक चांगली आठवण म्हणजे सातारा-सोलापूर मार्गावर माहुली येथील कृष्णापूल. मुंबई प्रांताचे लॉर्ड विल्सन यांच्या हस्ते २७ जून १९१५ मध्ये कृष्णा पुलाचे लोकार्पण झाले. त्यामुळे या पुलाला ‘द विल्सन ब्रिज’ हे नाव देण्यात आले. या पुलाच्या कामाला १९११ मध्ये मान्यता मिळाली मिळाली होती. चार वर्षे काम चाललेल्या या पुलाला शंभर वर्षांपूर्वी सुमारे ४ लाख ७५ हजार रुपये खर्च झाला होता.
‘द विल्सन ब्रिज’ हा पूल कृष्णा नदीवर असल्याने काळांतराने हा पूल ‘कृष्णा पूल’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या पुलाचे बांधकाम पूर्ण दगडात असून, याला सात गाळे आहेत. पुलाची लांबी १४० मीटर आहे. कृष्णा नदी कितीही दुथडी भरून वाहत असली तरी हा पूल कधीही पाण्याखाली गेला नाही.
रस्ते चांगले झाले, त्याचप्रमाणे हजारो वाहने या पुलावरून धावू लागली. त्यामुळे या पुलावर अनेकदा लहान-मोठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे या होणारे नुकसान सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वेळोवेळी भरून काढले जाते. खड्डे भरून घेणे, डागडुजी करणे, कठडे दुरुस्त करण्याचे काम वेळोवेळी केले जाते. यामुळे या पुलाला कसलाही धोका नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एकविसाव्या शतकात अभियांत्रिकी क्षेत्रात नवनवीन क्रांती घडत असतानाही तयार केलेले बांधकाम काही वर्षेच टिकतात. त्यानंतर त्याची पडझड सुरू होत असल्याचे दिसून येते. मात्र, ब्रिटिशांनी सुमारे शंभर वर्षांपूर्वी उभारलेल्या पुलाच्या आयुष्यासाठी लाखो रुपये ओतले. त्यामुळे कामाचा दर्जा सांगण्यासाठी कोणत्याही फूटपट्टीची गरज भासत नाही.
सातारा शहराजवळील कृष्णा नदीवरील हा पूलच दिमाखात सातारकरांच्या सेवेत आजही उभा असल्याचे दिसत आहे.
वेळोवेळी मलमपट्टी अन् रंगरंगोटी
या पुलावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावत असतात. त्यामुळे पुलाची झीज होत असतेच. तसेच लहान-मोठ्या अपघातांमुळे कठडे तुटतात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दरवर्षी डागडुजी तसेच रंगरंगोटी केली जाते.
माहुली येथील कृष्णा पुलाची गेल्या दीड वर्षापूर्वीच पाहणी व सर्व्हे करण्यात आला होता. या पाहणीत असे आढळून आले आहे की, पूल शंभर वर्षांचा होत असला तरी या पुलाला कसलाही धोका नाही. मजबूत बांधकाम असल्याने आणखी किमान दहा वर्षे तरी पूल सुरक्षित राहील.
- एस. एन. राजघोष,
कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग
सातारा-सोलापूर मार्गावरील माहुली येथील ब्रिटीशकालीन कृष्णापूल शंभर वर्षांनंतरही दणकट आहे.