वडिलांच्या जागी असलेला थोरला भाऊ गेला; विरहात धाकट्यानंही प्राण सोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 12:53 PM2020-10-12T12:53:20+5:302020-10-12T16:58:26+5:30
वडिलांप्रमाणे प्रेम केलेल्या सुखदु:खात सहभागी झालेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. काळजावर दगड ठेवून मोठ्या भावाचे सर्व कार्य पार केले. त्यानंतर रात्री मुंबईला गेले पण विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का आला अन् लहान भावानेही या जगाचा निरोप घेतला. हृदयद्रावक ही घटना जावळी तालुक्यातील पिंपळी येथे घडली.
दिलीप पाडळे
पाचगणी : वडिलांप्रमाणे प्रेम केलेल्या सुखदु:खात सहभागी झालेल्या मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का त्यांना सहन झाला नाही. काळजावर दगड ठेवून मोठ्या भावाचे सर्व कार्य पार केले. त्यानंतर रात्री मुंबईला गेले पण विरह सहन न झाल्याने हृदयविकाराचा धक्का आला अन् लहान भावानेही या जगाचा निरोप घेतला. हृदयद्रावक ही घटना जावळी तालुक्यातील पिंपळी येथे घडली.
पिंगळीमध्ये पवार कुुटुंबात चार भावंडे पण एकत्र कुटुंबपध्दत त्यामुळे सर्व कसं आनंदात चाललं होतं. मोठे भाऊ विठ्ठल पवार हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य होते. ते गावीच राहत होते. कुटुंबात त्यांचा शब्द अंतिम असे. इतर भाऊ त्यांचा अंतिम मानत होते. एकमेकांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण साजरा करत. दु:खात सहभागी होत होते.
पिंपळी येथे सोमवार, दि. ५ माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल महादेव पवार (वय ७२) यांचे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने घरात एक निर्वात पोकळी तयार झाली होती. हीच बाब कुटुंबियांच्या मनात घर करून राहिली होती.
दादाच्या निधनानंतर त्याचे मुंबईला वास्तव्यास असणारे तृतीय बंधू सुभाष गावी आले होते. सर्व विधी उरकून ते बुधवार, दि. ७ रोजी सुभाष पुन्हा मुंबईला निघून गेले. मात्र गुरुवार, दि. ८ रोजी रात्री त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा प्रयत्न कुटुंबीय व शेजाऱ्यानी केला पण त्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. आणि सुभाषने जग सोडलं.
दादापाठोपाठ लहान्यावरही अंत्यसंस्कार
दादांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानेचं यांच्यावरही काळाने घाला घातला. निष्ठुर काळाने नानाची सुभाष नानाच्या जीवनाची दोरी ओढली आणि पवार कटुंबियांवर दु:खाचा आघात केला. ज्या स्मशानभूमीत मोठ्या भावावर अंत्यसंसकार करण्यात आले. तिथंच काही दिवसांत सुभाषवर अंत्यसंस्कार करताना कुटुंबीय, नातेवाईकांबरोबरच ग्रामस्थांचे मन हेलावून होते.