इतिहासप्रेमींमधून नाराजी : दशकानंतरही संग्रहालयाची गाडी जागेवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:10 AM2020-01-22T00:10:16+5:302020-01-22T00:13:17+5:30

एका दशकात शहरासह जिल्ह्यातील अनेक विकासकामे अन् योजना मार्गी लागल्या. मात्र, लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्येच्या गर्तेत रुतलेली संग्रहालयाची गाडी काही पुढे सरकेना.

After decades, the museum's train is still in place! | इतिहासप्रेमींमधून नाराजी : दशकानंतरही संग्रहालयाची गाडी जागेवरच !

साताऱ्यातील हजेरी माळ येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीला दहा वर्षे झाली तरी संग्रहालयाचे काम अद्याप पूर्णत्वास आले नाही.

Next
ठळक मुद्देकामे गतिमान करण्याच्या ‘पुरातत्त्व’कडून हालचाली; दुसऱ्या टप्प्यात ९१ लाखांचा निधी मंजूर

सचिन काकडे ।

सातारा : साता-यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची नूतन इमारत उभारून तब्बल दहा वर्षे लोटली. मात्र, अद्यापही संग्रहालयाचे काम पूर्णत्वास आले नाही. एका दशकात शहरासह जिल्ह्यातील अनेक विकासकामे अन् योजना मार्गी लागल्या. मात्र, लोकप्रतिनिधींचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्येच्या गर्तेत रुतलेली संग्रहालयाची गाडी काही पुढे सरकेना.

साता-यातील मार्केट यार्ड येथे १९६६ रोजी छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या उभारणीचा मुहूर्त झाला व १९७० रोजी त्याचे काम पूर्ण झाले. शहराच्या वैभवात भर घालणाºया या संग्रहालयासाठी पुढे जागेची कमतरता भासू लागली. पावसाळ्यात या इमारतीस लागणाºया गळतीमुळे शिवकालीन वस्तूंचे जतन करून ठेवण्यात अनंत अडचणी निर्माण होऊ लागल्या. यामुळे शिवकालीन वस्तूंचे भव्य संग्रहालय व्हावे, अशी मागणी पुढे आली. दि. ५ फेब्रुवारी २००७ रोजी नूतन संग्रहालयासाठी शासनाने हिरवा कंदील दिला. यानंतर २००९ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.

मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी असलेल्या ‘हजेरी माळ’ मैदानावर नूतन संग्रहालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. इमारतीचे काम काही वर्षे अनेकविध कारणास्तव रखडले. मात्र, हे संग्रहालय पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने संग्रहालयाच्या कामास थोडी गती प्राप्त झाली. राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात संग्रहालयासाठी १ कोटी ८१ लाखांच्या खर्चास वित्तीय मान्यता दिली. या माध्यमातून कॅफेट एरिया, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते, तिकीटगृह, वाहन व्यवस्था आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.

दुस-या टप्प्यातील कामाकाजांसाठी पुरातत्त्व विभागाने २ कोटी ३६ लाखांच्या निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. यापैकी ९१ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, हा निधी पुरातत्त्व विभागाने बांधकाम विभागाकडे वर्ग केला आहे. या निधीतून अग्निशमन यंत्रणा, वीजव्यवस्था, संग्रहालतील दालने, रंगरंगोटी आदी कामे हाती घेतली जाणार आहे. तब्बल दहा वर्षे होऊनही संग्रहालयाचे कामकाज म्हणावे त्या गतीने पूर्ण झाले
नाही.

गेल्या दोन-तीन वर्षांत पुरातत्त्व विभागाकडून संग्रहालय पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सद्य:स्थिती पाहता हे संग्रहालय खुले होण्यासाठी नागरिकांना आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनिधींची याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

  • लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा

ऐतिहासिक वस्तूंच्या ठेव्याचा संग्रह करण्याचे आलय म्हणजे संग्रहालय. छत्रपती शिवाजी संग्रहालयातही इतिहासकालीन अनेक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. जुन्या संग्रहालयाची जागा अपुरी पडत असल्याने शहरातील हजेरी माळ येथे ३० गुंठे क्षेत्रात नव्या संग्रहालयाची उभारणी केली जात आहे.

 

  • संग्रहालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे संग्रहालय ठरणार आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी आता लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा सातारकरांसह व्यक्त होत आहे.

 

  • संग्रहालयाचे काम पाच टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात कॅफेट एरिया, संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, अंतर्गत रस्ते, तिकीटगृहाचे काम पूर्ण केले जाईल
  • दुसऱ्या टप्प्यात शस्त्र, अभिलेख, चित्र व वस्त्र यांच्या मांडणीसाठी वेगवेगळ्या दालनांची निर्मिती केली जाईल.
  • तिस-या टप्पा अंतर्गत सजावटीची कामे केली जाणार आहे.
  • चौथ्या टप्प्यात संग्रहालयातील स्पेशल लाईट इफेक्टची कामे होती.
  • पाचव्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील डायोरामाचे काम हाती घेतले जाईल.

 

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणार आहे. अनेक बारीक-सारीक गोष्टींचा विचार करून संग्रहालयातील कामे केली जात आहे. सध्या संग्रहालयाबाहेरील कामे प्रगतिपथावर असून, ही कामे दर्जेदार करण्यावर भर दिला जात आहे. लवकर अंतर्गत कामे सुरू होतील.
- उदय सुर्वे, सहायक अभिरक्षक, छत्रपती शिवाजी संग्रहालय


 

Web Title: After decades, the museum's train is still in place!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.