निवडणुकीनंतर पुन्हा तापतंय रान!
By admin | Published: November 2, 2014 09:00 PM2014-11-02T21:00:57+5:302014-11-02T23:32:08+5:30
निष्क्रिय कोण? : पाटण तालुक्यात आजी-माजी आमदारांची जुगलबंदी
पाटण : पाटणच्या जनतेने फैसला केल्यानंतर तालुक्यातील नेत्यांचा श्रेयवाद विसरून जाईल, अशी अपेक्षा असतानाच दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकदा एकमेकांविरोधात दंड थोपटले आहे. निवडणुकीनंतर त्यांच्यामध्ये जुगलबंदी पाहण्यास मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना सामोरे जाताना विक्रमसिंह पाटणकर यांनी पुढील पाच वर्षे निष्क्रियतेचा अनुभव जनतेला येईल, असा टोला नूतन आमदार शंभूराज देसाई यांना लगावला होता.
त्याचे उत्तर देताना आमदार पाटणकर हे किती निष्क्रिय होते, याचा निकाल जनतेने साडेबत्तीस पटीने दिला आहे,’ असे प्रतिउत्तर दिले. त्यामुळे पाटण तालुक्यात सध्या निष्क्रियतेची ऐशी की तैसी सुरू आहे.
माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी २६ वर्षे पाटण तालुक्यावर अधिराज्य गाजविले. त्याच पाच वर्षे राज्याचे बांधकाममंत्री होते, तर तालुक्यातील सहकारी संस्थांचे जाळे पाटणकरांच्या हाताशी. याउलट पाच वर्षे आमदार आणि साखर कारखाना जवळपास त्यांच्याच अशा स्थिती विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांची होती. आता निवडणूक झाली आहे. निकाल लागला आहे. तरीही दोन्ही नेत्यांनी एकमेकांना निष्क्रिय ठरविण्यात वेळ घालविणे पसंत केले आहे.
पाटण तालुक्याचा न झालेल्या विकास आणि जनतेच्या जीवनमानात राहून गेलेला मागासलेपणा यातूनच निष्क्रियतेचा ठपका लागू होतो. हे कोणीही नाकारू शकत नाही. मग निष्क्रियतेचे बोट दाखविताना इतर चार बोटे आपल्याकडे वळली आहेत, हे नेत्यांच्या कदाचित स्मरणात नाही.
तेव्हा यापुढे तरी कोण निष्क्रिय आणि कोण सक्रिय याचा हिशोब न मांडता दोन्ही नेत्यांनी आपापल्या अधिकाराचा वापर करून कर्तृत्व सिद्ध करून दाखविण्याची गरज आहे. अन्यथा पुढच्या पाच वर्षांनंतर पाटणची जनता निष्क्रिय नेत्यांचा पंचनामा करायला सज्ज आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी आज वादावादीत अडकून राहण्यापेक्षा पुढच्या पाच वर्षांचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)