निवडणूक बोहल्यावर दिग्गजांसह गावकारभारी...
By admin | Published: February 13, 2017 10:51 PM2017-02-13T22:51:50+5:302017-02-13T22:51:50+5:30
कऱ्हाड तालुका : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत माघारीसाठी उमेदवारांची पळापळ; कुठे सून तर कुठे सासूने काढला अर्ज
कऱ्हाड : आपणही निवडणूक लढवायची अन् गावकारभारी व्हायचं असं स्वप्न उराशी बाळगून मोठ्या जोशानं जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी अर्ज भरलेल्यांपैकी काही उमेदवारांनी सोमवारी अर्ज मागे घेतले. निवडणुकीच्या लग्नाला मोठ्या थाटामाटात उभे राहून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या ४३५ उमेदवारांपैकी आता प्रत्यक्ष निम्मेच उमेदवार रिंगणात उरले आहेत. विशेष म्हणजे अर्ज काढण्यासाठी येताना ‘ना चेहऱ्यावर हसू ना डोळ्यात असू’ असे चित्र उमेदवारांच्यामध्ये दिसून आले.
येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह याठिकाणी सोमवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया शांततेत पार पडली. हसत-खेळत पार पडलेल्या प्रक्रियेवेळी दिग्गजांसह गावकारभाऱ्यांनीही उपस्थिती लावली होती. कोणी अर्ज काढला की लगेच त्याची माहिती सोशल मीडियावर टाकण्याचे काम चोखपणे यावेळी अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पार पाडलं. काहींनी तर गट व गणातील उमेदवारांचीही यादी हातामध्ये धरून ती अपडेट करण्याचं काम केलं.
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात गावातील कुणी दिसले की, कशाला आला आहात? अर्ज काढायला का? कुणी अर्ज काढलाय माहिती आहे का?, असे अनेक प्रश्न जो-तो एकमेकांना विचारीत होता. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवून ती जिंकायचीच म्हणून बारा गट व चोवीस गणांतून कऱ्हाड तालुक्यातून यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, कऱ्हाड तालुका विकास आघाडी, शिवसेना, मनसे, अपक्ष म्हणून ४३५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. त्यामुळे गावागावांत अन् भागातील राजकारण चांगलेच तापले होते. सर्वांना अर्ज माघारीच्या दिवसाची प्रतीक्षा लागून
राहिली होती. अखेर तो दिवस उजाडला आणि अनेक गट व गणातील निवडणूक लढविण्याऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज माघार प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किशोर पवार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्यासह गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी उपस्थिती लावली होती. (प्रतिनिधी)
शेवटच्या क्षणी उमेदवारांची पळापळ...
आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अगदी कमी वेळ उरला असल्याने शेवटच्या क्षणी उमेदवारांची चांगलीच पळापळ झाली. काही उमेदवारांनी धावत-पळत जाऊन आपले अर्ज मागे घेतले. यावेळी अर्ज मागे घेण्यासाठी केवळ तीन मिनिटे अवधी बाकी असताना एका उमेदवाराने आपण भरलेला अर्ज निवडणूक कक्षाकडे धावत जाऊन मागे घेतला.