लष्करात भरती होऊन कन्येने गावचे नाव उंचावले, फुलांचा वर्षाव करत संपूर्ण गावाने स्वागत केले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 05:17 PM2021-11-22T17:17:22+5:302021-11-22T17:19:01+5:30
Indian Army News: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमधे भरती होऊन प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या जावळी तालुक्यातील गांजे गावची कन्या शिल्पा चिकणे हिचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले.
सातारा - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, चिकाटीच्या जोरावर आसाम रायफलमधे भरती होऊन प्रथम महिला सैनिक होण्याचा बहुमान प्राप्त केलेल्या जावळी तालुक्यातील गांजे गावची कन्या शिल्पा चिकणे हिचे ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले. फुलांची उधळण, भारत माता की जयचा जयघोष आणि सैनिकांच्या वर्दीतील शिल्पाच्या कडक एंट्रीने गांजे गावातील रस्ते दुमदुमून गेले.
सहा महिन्यांपूर्वी शिल्पा चिकणे हिची आसाम रायफलमध्ये निवड झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी तिला बोलावण्यात आले. हे प्रशिक्षण पूर्ण करून ती मूळगावी आज आली. त्या निमित्ताने आपल्या गावातील कन्येच्या यशाचा अभिमान ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ग्रामस्थ विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गांजे गावातील पांडुरंग चिकणे यांची ती कन्या आहे. घरची परिस्थिती बेताचीच. आई-वडील शेतकरी. मुलगा नाही म्हणून नाराज असणाऱ्या या कुटुंबात शिल्पाने मुलाची कमतरता भरून काढत मुलाच्या तोडीचे काम केले.
गांजे गावातून मेढ्याला पायी जात जावली करिअर अकॅडमीमध्ये प्रचंड कष्ट करीत शिल्पाने आसाम रायफलमधे भरती होण्यासाठी प्रयत्न केले. तिच्या अथक परिश्रमाने आज तिने प्रशिक्षणाचा अवघड टप्पा पार करून आपल्या कारकीर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे.
लेकीचा तो वर्दीतील रुबाब पाहून, ग्रामस्थांनी केलेले जंगी स्वागत पाहून मनाचं समाधान झालं. आज मुलगा नसल्याचं शल्य न वाटता लेकीचा अभिमान वाटत आहे. हे सर्व पाहून मन भरून आले, - पांडुरंग चिकणे, वडील