धुमश्चक्रीनंतर जावळीत सन्नाटा

By Admin | Published: February 22, 2017 10:55 PM2017-02-22T22:55:07+5:302017-02-22T22:55:07+5:30

मेढ्यात कडकडीत तर तालुक्यात संमिश्र बंद : संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त

After fury silence, | धुमश्चक्रीनंतर जावळीत सन्नाटा

धुमश्चक्रीनंतर जावळीत सन्नाटा

googlenewsNext



मेढा : खर्शी बारामुरे येथे मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या व त्यांच्या समर्थकांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीनंतर जावळी तालुक्यात भीतीयुक्त शांतता असून, बुधवारी राष्ट्रवादीने जावळी तालुका बंदच्या दिलेल्या हाकेला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
तालुक्यात मेढा, केळघर, कुरहर परिसरात दुपारी २ पर्यंत बंद पाळण्यात आला. तर कुडाळ येथे बुधवारी आठवडा बाजार असल्याने तेथील व्यवहार सुरळीत सुरू होते. दरम्यान, वसंतराव मानकुमरे यांनी खासदार उदयनराजे भोसले व इतर जणांविरुद्ध मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, वसंतराव मानकुमरे यांच्या विरुद्ध खासदार समर्थक अजिंक्य मोहिते व पोलिस नाईक शंकर माने यांनी फिर्याद दाखल केली आहे.
गुरुवारी होणारी मतमोजणी व तालुक्यातील तंग वातावरणामुळे १४४ कलम लागू करण्यात आले असून, पोलिसांनी बुधवारी सकाळपासूनच तालुक्यात ठिकठिकाणी वाहने तपासणे मोहीम सुरू केली आहे. तालुक्यात संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवला असून, वसंतराव मानकुमरे यांच्या मानकुमरे पॉइंट या निवासस्थानी देखील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
खर्शी बारामुरे येथे मंगळवारी खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाडीवर व समर्थकांच्या गाडीवर वसंतराव मानकुमरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या दगडफेकीनंतर दोन्ही गटांत धुमश्चक्री झाली. यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीत तळ ठोकला.
रात्री उशिरापर्यंत वसंतराव मानकुमरे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन खासदारांचे हे पूर्ण नियोजित कृत्य असल्याचा आरोप केला. व त्यांच्या गुंडगिरीची पद्धत जिल्ह्याला माहिती असून, त्यांच्यावर व त्यांच्या समर्थक गुंडांवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत वसंतराव मानकुमरे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत आपल्याला मारहाण करून आपली पत्नी जयश्री हिच्या गळ्यातील ८ तोळे सोन्याचे मंगळसूत्र खासदार समर्थक अजिंक्य मोहिते याने हिसकावल्याचे सांगितले. व याबाबत खासदार भोसले व इतर नऊ ते दहाजणांवर फिर्याद दाखल केली आहे.
वसंतराव मानकुमरे वगैरे यांच्या विरोधात अजिंक्य मंगेश मोहिते याने तक्रार दाखल केली असून, यामध्ये खर्शी बारामुरे येथे आपल्या गाडीवर (एमएच ११ बीव्ही ०६०५) ३५ ते ४० जणांनी हल्ला करून आपल्या गळ्यातील ५ तोळ्यांची सोन्याची चेन, १ तोळ्याची अंगठी व रोख २० हजार काढून घेतल्याचे म्हटले आहे. यावेळी स्वप्नील मानकुमरे याने आपल्या गळ्याला गुप्ती लावली व जयश्री मानकुमरे यांनी थोबाडीत मारल्याचेही फिर्यादित हटले आहे. यात एकूण २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
याबाबत पोलिस नाईक शंकर एकनाथ माने यांनीही वसंतराव मानकुमरे, स्वप्नील मानकुमरे वगैरे ३० ते ४० जणांविरुद्ध मेढा पोलिस ठाण्यात तक्रार केली असून, यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांच्याबरोबर एस्कॉर्ट कार्य
असताना वसंतराव मानकुमरे वगैरेंनी शासकीय वाहन (एमएच ०१ एबी २८३) या गाडीवर दगडफेक करून सुमारे ७५ हजारांचे नुकसान
झाल्याचे व या दगडफेकीत पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंडगे, पोलिस कॉन्स्टेबल धीरज कोरडे जखमी झाल्याचे म्हटले आहे.
एकंदरीत जावळी तालुक्यात गेल्या चार दिवसांत पावशेवाडी, बामणोली व खर्शी बारामुरे येथे घडलेल्या घटनेने तालुक्यात भययुक्त शांतता आहे.
बुधवारी मेढा पोलिसांनी मेढा-सातारा मार्गावर मोळाचा ओढा परिसर, सह्याद्री बोर क्लबसह मेढा-कुडाळ मार्ग मेढा-महाबळेश्वर मार्गावर तपासणी मोहीम सुरूच ठेवली आहे.
दरम्यान, तालुक्यात गेल्या चार दिवसांतील घडलेल्या घटना म्हणजे सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे एस. एम. पार्टे गुरुजी यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
कडेकोट पोलिस बंदोबस्त
गेल्या चार दिवसांतील जावळीत घडत असलेल्या प्रकाराबाबत आमदार शशिकांत शिंदेंची भूमिका व प्रतिक्रिया सौम्यच असल्याची ही चर्चा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत होती. गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीचा निकाल अन् तालुक्यातील वातावरणाच्या पार्श्वमभूमीवर मेढा शहराला छावणीचे स्वरूप प्राप्त होऊ लागले असून, तालुक्याच्या प्रशासनाने देखील जादा पोलिस कुमक मागवली आहे.

Web Title: After fury silence,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.