अजबच झालं! दोन मुली झाल्यानंतर म्हणतोय, मला लग्न मंजूर नव्हते; पत्नीची पोलीस ठाण्यात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 04:05 PM2022-05-21T16:05:20+5:302022-05-21T16:05:42+5:30
दुसरी मुलगीच झाल्यावर माझ्यावर संशय घेतला. तसेच प्रसूतीसाठी झालेला ९० हजारांचा खर्च तुझ्या माहेरच्या लोकांकडून घेऊन ये. अशी मागणी केली.
सातारा : दोन मुली झाल्यानंतर मला लग्न मंजूर नव्हते, असे म्हणत पतीने पत्नीला जाचहाट सुरू केला. या प्रकाराला कंटाळून अखेर विवाहितेने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पतीसह सासू, सासऱ्यांवर जाचहाटाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पती राहुल शिवाजी शिंदे (वय ३७), सासरे शिवाजी नथू शिंदे (६९), सासू शालन शिवाजी शिंदे (४९, सर्व रा. संपदा हाैसिंग सोसायटी कर्मवीरनगर सातारा), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत सोनाली राहुल शिंदे (३१, रा. सध्या रा. कोळकी, ता, फलटण, जि. सातारा) या विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये मला सोने कमी घातले आहे. तू मला पसंत नव्हतीस. तू मला सोडचिठ्ठी दे. मला हे लग्न मंजूर नव्हतं, अस बोलून पतीने माझा मानसिक व शारीरिक छळ केला.
दुसरी मुलगीच झाल्यावर माझ्यावर संशय घेतला. तसेच प्रसूतीसाठी झालेला ९० हजारांचा खर्च तुझ्या माहेरच्या लोकांकडून घेऊन ये. अशी मागणी केली. त्याचबरोबर घराशेजारी राहणाऱ्या एका माणसाच्याविराेधात पोलीस ठाण्यात तक्रार दे तरच तुला नांदवतो, असे म्हणून मारहाण करत शिवीगाळही केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.