मृत्यूनंतर त्यांना रक्ताच्या नात्यानेही नाकारले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:37 AM2021-05-01T04:37:21+5:302021-05-01T04:37:21+5:30
सातारा : घरातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला की आख्खं कुटुंब शोकसागरात बुडून जातं. त्याच्यावर विधिवत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात; ...
सातारा : घरातील एखाद्या सदस्याचा मृत्यू झाला की आख्खं कुटुंब शोकसागरात बुडून जातं. त्याच्यावर विधिवत पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात; परंतु कोरोनामुळे रक्ताची नाती दुरावू लागली असून, अशा मृतांच्या अंत्यसंस्काराला कुटुंबातील एक व्यक्तीही स्मशानभूमीत फिरकत नाही. या निष्ठुर व्यक्तींमुळे पालिका कर्मचारीच मृतांच्या नातेवाइकाची भूमिका बजावत आहेत.
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांबरोबरच मृतांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. अशा मृतांवर साताऱ्यातील संगममाहुली येथे अंत्यसंस्कार केले जात आहेत. प्रशासनाने ही जबाबदारी सातारा पालिकेच्या खांद्यावर सोपविली आहे. पालिकेचे कर्मचारी वर्षभरापासून हे काम मोठ्या हिमतीने पार पाडत असून, आजपर्यंत त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभवही आले आहेत.
कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या मृतांपैकी काही नागरिक घरातील सदस्याचे शेवटचे दर्शन व्हावे म्हणून खूप धडपडत असतात. काहीजण अंत्यसंस्कारांना हजेरी लावतात; तर दुसरीकडे असे अनेक नातेवाईक आहेत, जे स्मशानभूमीकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनाच अशा मृतांच्या नातेवाइकाची भूमिका बजावावी लागत आहे. घरातील ज्या सदस्याच्या सान्निध्यात आपण लहानाचे मोठे झालो, ज्याच्या अंगाखांद्यावर आपण वाढलो, अशा व्यक्तीचा शेवट असा होणं, यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं?
(चौकट)
नातेवाइकांची भूमिका
सातारा पालिकेच्या पथकाने आतापर्यंत १८०० कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. यांपैकी पाचशेहून अधिक मृतांचे नातेवाईक अंत्यसंस्कारांसाठी आलेच नाहीत. अशा मृतांवर कर्मचाऱ्यांना नातेवाइकांच्या भूमिकेतून अंत्यसंस्कार करावे लागले.
(चौकट)
पाच माणसांना परवानगी; मृतांच्या नशिबी तेही नाही
कोरोनाने मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला शासनाने पाच सदस्यांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली आहे. मात्र, अनेकजण भीतीपोटी अंत्यसंस्कारांना येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे मृत व्यक्तीच्या आयुष्याचा शेवटही इतका निर्दयी होत आहे.
(कोट)
वर्षभरापासून मी कोरोना मृतांवर अंत्यसंस्कारांचे काम करीत आहेत. वर्षभरात अनेक वाईट अनुभव आले. मृताला अग्नी देणे तर दूरच; त्याच्या शेवटच्या दर्शनाला घरातील एक सदस्य न येणं यापेक्षा मोठं दु:ख काय असू शकतं?
- कपिल मट्टू, कर्मचारी
(कोट)
एकवेळ दगडाला पाझर फुटेल; पण काही व्यक्ती इतक्या निष्ठुर झाल्या आहेत की त्यांना कधीच पाझर फुटणार नाही. जेव्हा गरज आहे तेव्हाच रक्ताची नाती साथ सोडत आहेत.
- लक्ष्मण कांबळे, कर्मचारी
(पॉइंटर)
७५ टक्के रुग्णांवर पालिका कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे झालेले मृत्यू : २४००
पालिका कर्मचाऱ्यांनी केलेले अंत्यविधी : १८००
(डमी न्यूज)